सिंधुदुर्गनगरी : कणकवली तालुक्यातील कळसुली गवसेवाडी येथील रहिवासी आणि नामवंत ज्योतिषी श्री.जगन्नाथ तुकाराम देसाई (वय ८२)यांचे कुडाळ येथील खासगी रुग्णालयात बुधवारी १५ जानेवारी रोजी सकाळी सहा वाजताच्या दरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुलगे,सुना,दोन विवाहित मुली,जावई ,भाऊ,भावजय,पुतणे, पुतण्या,नातवंडे असा परिवार आहे. वारकरी संप्रदाय विचाराचे वारकरी, नामवंत ज्योतिषी ,जमीन व पाणी जागा दाखविणारे तज्ञ, गुरांचे वैद्य म्हणून ते प्रख्यात होते.
सार्वजनिक आणि सामाजिक कार्यक्रमात त्यांचा नेहमीच पुढाकार होता.सामाजिक बांधिलकी जपणारे समाजसेवक म्हणून त्यांची विशेष ओळख होती.मनमिळाऊ स्वभावामुळे ते परिचित होते.त्यांच्या जाण्याने कळसुली पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे. कळसुली गवसेवाडी येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर बुधवारी सायंकाळी सात वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.यावेळी विविध क्षेत्रातील मंडळी उपस्थित होती.