
सावंतवाडी : शहरातील जीर्ण व धोकादाय झालेली झाड तोडण्याची मोहीम पुन्हा सुरु करण्यात यावी, पंचम खेमराज महाविद्यालयाच्या मुख्य दरवाजासमोरील भेडले माड धोकादायक झाला असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने तो हटविण्यात यावा अशी मागणी मुख्याधिकारी सागर साळुंखे यांच्याकडे वीरेश ठाकूर यांनी केली आहे.
शहरात सप्टेंबर 2023 मध्ये गणेश चतुर्थीच्या कालावधीत भजन सेवा करून रात्री घरी जाताना राजवाडा येथील झाड अंगावर पडून दोन युवकांचा जागीच मृत्यू झाला होता. ही घटना घडल्यानंतर अनेक सामाजिक संस्था सामाजिक कार्यकर्ते पक्ष संघटनांनी प्रशासनाला जबाबदार धरून आंदोलने केली. या आंदोलनाचा परिणाम म्हणून सावंतवाडी नगरपरिषद, वनविभाग, महसूल विभाग यांनी संयुक्तपणे वित्तहानीस कारणीभूत ठरणाऱ्या झाडांचे सर्वेक्षण करून ती तोडण्यास प्रारंभ केला होता. यावेळी नागरिकांनी प्रशासनाचे अभिनंदनही केले. परंतु, सद्यस्थितीत ही झाडे तोडण्याची मोहीम प्रशासनाने थांबवली आहे. शहरातील पंचम खेमराज महाविद्यालय च्या मुख्य दरवाजासमोर एक भला मोठा भेडले माड सुकलेला आहे. त्याची झावळे पूर्णपणे सुकून गेली असून खाली वाकलेली आहेत. शाळा व कॉलेजची मुले या दरवाजातून त्या झाडाजवळून ये-जा करत असतात. तेथे फार मोठ्या प्रमाणात इतर लोकांची वर्दळपण असते. झाडाजवळून विद्युत भरीत वाहिन्याही गेलेली आहे. जीर्ण झालेली झावळे विद्युत वाहिन्यावर पडल्यास येणाऱ्या जाणाऱ्यांच्या अंगावर पडून जीवित आणि वित्तहानी टाळण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने जीवितास धोका असणारी झाडे तोडण्यास पुन्हा प्रारंभ करावा अशी मागणी मुख्याधिकारी यांना केली आहे.