संत निरंकारी मिशनच्या वतीने ओरोस ख्रिश्चनवाडीतील पूरग्रस्तांना मदत

Edited by:
Published on: August 14, 2024 07:28 AM
views 309  views

सिंधुदुर्ग : ०७ जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे पिठढवळ नदीची पातळी वाढली व जवळच असलेल्या ख्रिश्चनवाडी मधील घरांमध्ये मोठ्या प्रमावर पाणी घुसले. या पुरामुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले. काही मातीची घरे जमीनदोस्त झाली, पाण्याच्या  प्रवाहात आलेल्या घरांतील सामान वाहून गेलं. शेतकरी तसेच इतर नागरिकांनी साठवलेल धान्य भिजून खराब झाल. अश्यातच अनेक लोकप्रतिनिधी, दानशूर व्यक्ती, तसेच सेवा भावी संस्थानी जमेल तशी मदत जमा करून या सर्व नागरिकांना आधार दिला.

काही दिवसांनी असे लक्षात आले की पिण्याच्या पाण्याचे स्रोत पूर्ण शुद्ध नाही झाले यामुळे येथील नागरिक पिण्याचे शुद्ध पाणी विकत घेऊन वापरत आहेत. हे लक्षात घेऊन संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या वतीने आर्थिक दुर्बल असणाऱ्या परिवारांना स्वयंचलित वॉटर प्युरीफायर देऊन मदत करण्यात आली. यावेळी आदरणीय फादर मॅलविन फेराव यांनी आभार मानून मानवतेच्या कार्याप्रसंगी जमलेल्या निरंकारी भक्तांसाठी प्रभू येशुकडे आरोग्य व यशस्वीतेसाठी प्रार्थना करत असल्याचे सांगितले.  

संत निरंकारी मिशन हे आध्यात्मिक व सामाजिक विचारधारा जतन करणारे मिशन आहे. या अंतर्गत संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या माध्यमातून आपत्ती मदत व पुनर्वसन कार्ये कुडाळ, दोडामार्ग, सावंतवाडी, चिपळूण, महाड, उत्तराखंड व केरळ आदी ठिकाणी झाले आहे. ओरोस येथील मदतकार्यवेळी निरंकारी मंडळाचे  सेक्टर ओरोस संयोजक श्री.  हनुमंत सावंत, मुखी, ज्ञानप्रचारक, सेवादल अधिकारी, ग्रामपंचायत सदस्य श्री. पांडुरंग मालवणकर, स्थानिक लोकप्रतिनिधी, समाजसेवक व निरंकारी भक्तगण उपस्थित होते.