
कणकवली : कुडाळ तालुक्यातील झाराप तिठा येथे झालेल्या अपघाताच्यावेळी राष्ट्रीय महामार्ग उपविभाग सावंतवाडीचे कनिष्ठ अभियंता मुकेश साळुंखे यांचे आडनाव विचारून मारहाण केली. तसेच मारून टाकण्याची धमकी देत शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी माजी आमदार वैभव नाईक यांना अतिरीक्त सत्र तथा विशेष न्यायाधिश (अॅट्रॉसिटी) श्रीमती डी. एस. देशमुख यांनी ५० हजार रुपये जाच मुचलक्याचा सशर्थ जामिन मंजूर केला. श्री. नाईक यांच्यावतीने ऍड. उमेश सावंत यांनी काम पाहिले.
३० सप्टेंबर रोजी झाराप तिठा येथे महामार्गावर असलेल्या अनधिकृत मिडलकटमुळे अपघात झाला. यात एका शाळकरी विद्यार्थ्याचा मृत्यू झाला होता. यावेळी गावकरी जमा झाले होते. त्याचवेळी माजी आमदार वैभव नाईक हे सावंतवाडी दौऱ्यासाठी जात असताना त्याठिकाणी थांबले. तेवढ्यात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे अधिकारी उपअभियंता वृषाली पाटील व फिर्यादी त्याठिकाणी पोहोचले. यावेळी श्रीमती पाटील यांना 'तुम्ही बाजूला व्हा' असे म्हणत फिर्यादीला मारहाण केली व 'कोण रे तू' असे म्हणून जातीवाचक शिवीगाळ केली, अशी फिर्याद साळुंखे यांनी दिली होती. त्यानुसार सरकारी कामात अडथळा, शासकीय कर्मचाऱ्याला मारहाण व जातीवाचक शिवीगाळ प्रकरणी अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा ३/१ आर व एस तसेच व्हीए प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. याबाबतचा तपास उपविभागिय अधिकारी सावंतवाडी हे करत होते.
याबाबत श्री. नाईक यांच्यावतीने अटकपूर्व जामिनासाठी दाखल करण्यात आलेला अर्ज मंजुर करताना तपासात सहकार्य करावे व साक्षीदारांवर दबाव आणू नये आदी अटी घालण्यात आल्या आहेत.










