धरणग्रस्तांच्या समस्या जाणून घेण्यासाठी मदत पुनर्वसन मंत्री लवकरच सिंधुदुर्ग दौऱ्यावर

जिल्हाध्यक्ष अबीद नाईक, जिल्हा कार्याध्यक्ष काका कुडाळकर यांनी घेतली मुंबईत भेट
Edited by: उमेश बुचडे
Published on: August 11, 2023 19:07 PM
views 203  views

कणकवली : गेल्या अनेक वर्षापासून काम सुरू असलेल्या नरडवे महंमदवाडी, टाळबा व इतर धरणांच्या पुनर्वसनाचे प्रश्न तसेच नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना मदतीच्या अनुषंगाने राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक व कार्याध्यक्ष काका कुडाळकर यांनी राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल अनिल पाटील व आमदार अनिकेत तटकरे यांची मुंबईत भेट घेत चर्चा केली. या अनुषंगाने लवकरच जिल्हा दौरा आयोजित करून पुनर्वसन प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन श्री. पाटील यांनी दिल्याची माहिती श्री नाईक यांनी दिली.

मुंबई येथे झालेल्या या चर्चेवेळी राष्ट्रवादीचे सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, सरचिटणीस संजय बोरगे, चिटणीस बाप्पा सावंत, जिल्हा कार्याध्यक्ष काका कुडाळकर, यावेळी प्रांतीक सदस्य सावळाराम अणावकर, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एम. के. गावडे, जिल्हा बँकेच्या माजी संचालिका प्रज्ञा परब, सूरज परब आदी उपस्थित होते.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नरडवे येथील महंमदवाडी धरणाचे काम गेली अनेक वर्षे सुरू आहे. याठिकाणी पुनर्वसनाचे प्रश्न अद्याप सुटलेले नाहीत. तसेच टाळंबा धरणाच्या पुनर्वसनाबाबतच्या समस्या प्रलंबीत आहेत. सिंधुदुर्गमध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाबाबत आपत्तीग्रस्त नागरीकांना मदत देण्याच्या अनुषंगानेही त्यावेळी चर्चा करण्यात आली.

यावेळी मंत्री श्री. पाटील व आम. अनिकेत तटकरे यांनी या पुनर्वसनाच्या प्रश्नांबाबत लक्ष घालून ते लवकरात लवकर मार्गी लावण्यात येतील, असे सांगितले. तसेच अतिवृष्टीमुळे होणाऱ्या नुकसान वा जिवीतहानीबाबत तातडीने मदत केली जाते. सिंधुदुर्ग जिल्हयात यावर्षी अतिवृष्टी, नैसर्गिक आपत्तीने झालेल्या नुकसानीचा अहवाल मागवून घेऊन देय असलेली सर्व भरपाई तातडीने देण्यात येईल, अशी ग्वाही श्री. पाटील यांनी दिली. यावेळी श्री. नाईक यांनी सिंधुदुर्ग जिल्हयातील धरणग्रस्तांच्या समस्या तसेच अतिवृष्टीने नुकसान झाल्याने निर्माण झालेली स्थिती याबाबत माहिती दिली व शेतकऱ्यांना जास्तीत जास्त भरपाई देण्याची मागणी केली.