विधवा प्रथेला नकार,माणुसकीला होकार !

कलमठ ग्रा.पं.चा क्रांतिकारी पुढाकार ; घरपट्टी, पाणीपट्टी माफ होणार
Edited by: उमेश बुचडे
Published on: January 08, 2026 13:27 PM
views 128  views

कणकवली : पतीचा मृत्यू झाल्यानंतर त्या स्त्रीचे सौंदर्य काढून घेणाऱ्या, आणि तिला आयुष्यभर विधवा म्हणून जगण्यास भाग पाडणाऱ्या विधवा प्रथेला नकार देऊन माणुसकीला होकार देणारा महत्त्वपूर्ण निर्णय कणकवली तालुक्यातील कलमठ ग्रामपंचायतीने घेतला आहे. ज्या घरामध्ये विधवा प्रथा पाळणार नाही अशा घरातील घरपट्टी आणि पाणीपट्टी माफ करण्याचा क्रांतिकारी पुढाकार कलमठ ग्रामपंचायतचे सरपंच संदीप मेस्त्री यांनी घेतला आहे. सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त सरपंच मेस्त्री यांनी यासंबंधीची घोषणा केली आहे.

महिला स्नेही गाव संकल्पनांवर आधारित काम करत असताना असा ठराव घेऊन कलमठ गावच्या वतीने सावित्रीबाईंना खरे अभिवादन असल्याचे मत सरपंच संदीप मेस्त्री यांनी व्यक्त केले.

संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान, पंचायतराज समृद्धी अभियान,आणि शासनाच्या इतर सर्व उपक्रमांमध्ये हिरीरीने भाग घेणाऱ्या कलमठ ग्रामपंचायतीने विधवा प्रथा बंदीसाठी क्रांतिकारी पाऊल उचलले आहे. 

कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड ग्रामपंचायतने सुरुवातीला विधवा प्रथा बंदीची मोहीम सुरू केली. पतीचे निधन झाल्यानंतर पत्नीच्या अंगावरील मंगळसूत्र काढून घेणे, तिच्या बांगड्या फोडणे आणि तिच्या कपाळा वरील कुंकू पुसणे असे कुप्रकार अनेक गावांमध्ये ते आजही केले जातात. स्त्रीचे सौंदर्य काढून घेणे हा त्यामागचा उद्देश असतो. ही प्रथा बंद करण्याचा ठराव हेरवाड ग्रामपंचायत ने घेतल्यानंतर राज्य शासनाने त्याची दखल घेत सर्वच ग्रामपंचायतीने असा ठराव घ्यावा आणि विधवा प्रता बंद करावी असा निर्णय घेतला.

राज्य शासनाच्या सूचनेनंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वच ग्रामपंचायतीने विधवा प्रथा बंद करण्याचे ठराव घेतले. त्याचा काही प्रमाणात परिणाम झाला सुद्धा. अनेक महिलांनी पती केल्यानंतर विधवा प्रथा पाळली नाही. मात्र सर्वच ठिकाणी विधवा प्रथा बंद केलेली नाही. अनेक ठिकाणी ही प्रथा पाळली जाते.

या प्रथेवर कठोर प्रहार करण्यासाठी कलमठ ग्रामपंचायतने पुढाकार घेतला आहे. सरपंच संदीप मेस्त्री यांनी अध्यक्षपदावरून हा ठराव मांडला असून सर्वानुमते अनुमोदन देण्यात आले.

नव्या वर्षाच्या पूर्वसंध्येला कलमठ ग्रामपंचायतीच्या सभेमध्ये स्वतः सरपंच संदीप मेस्त्री यांनी विधवा प्रथा पूर्णपणे बंद करणे आवश्यक असल्याचे नमूद केले. आणि ज्या घरामध्ये विधवा प्रथा बंद केली जाईल किंवा विधवा प्रथा पाळली जाणार नाही अशा घरांची घरपट्टी आणि पाणीपट्टी थेट माफ करण्याचा निर्णय घेणारा ठराव मांडला.विशेष म्हणजे हा ठराव एकमताने मान्य करण्यात आला. सरपंच संदीप मेस्त्री यांनी ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थांनी केलेल्या सहकार्याबद्दल आनंद व्यक्त केला असुन यापुढे कलमठ गावात ही प्रथा पूर्णपणे बंद केली जाईल, यासाठी आम्ही कसोशीने प्रयत्न करू असे म्हटले आहे. कोणत्याही प्रथेपेक्षा  माणुसकी श्रेष्ठ आहे. त्यामुळे आम्ही हा निर्णय घेतल्याचे ही सरपंच संदीप मेस्त्री यांनी म्हटले आहे.