
सावंतवाडी : मळेवाड प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये कार्यरत असणाऱ्या वैद्यकीय अधिकारी राखीराव यांचा आरोग्य खात्याशी केलेला ११ महिन्याचा करार संपल्याने त्यांचे पद रिक्त झाले होते. यामुळे याठिकाणी एमबीबीएस डॅाक्टरची नियुक्ती करावी अशी ग्रामस्थांची व ग्रामपंचायतची मागणी होती.या मागणीला अखेर यश आले असून उद्या डॉ.नम्रता लोंढे या डॅाक्टरांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती मळेवाड - कोंडूरे उपसरपंच हेमंत मराठे यांनी दिली. डॉ.अदिती ठाकूर ह्या यापूर्वी एकच वैद्यकीय अधिकारी या प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असून त्या केंद्राचा कार्यभार सांभाळत होत्या. मात्र आता नव्याने डॅाक्टरांची नियुक्ती झाल्याने या केंद्रात आता दोन वैद्यकीय अधिकारी कार्यरत राहणार आहेत.