
दोडामार्ग : दोडामार्ग तालुक्यातील होऊ घातलेल्या २८ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आज शेवटच्या दिवशी ४७ सरपंच तर २२१ सदस्य जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. आतापर्यंत एकूण २८ सरपंच पदासाठी ९४ तर २२३ सदस्य पदासाठी ३८६ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. ही दोन्ही संख्या ४८० वर पोहचली आहे
शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने व ऑफलाईन अर्ज दाखल करण्याची निवडणूक विभागाने मुभा दिल्याने एकाच दिवशी विक्रमी २६८ जणांनी अर्ज दाखल केले . अनेक दिग्गज यावेळी थेट सरपंचपदी आपले नशीब आजमावत असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
माजी सरपंचांपैकी खोक्रल सरपंच देवेंद्र शेटकर, परमे सरपंच आनंद नाईक, कोनाळ सरपंच पराशर सावंत, उसप सरपंच दिनेश नाईक यांसह अनेक जण सरपंच व सदस्य पदासाठी निवडणूक रिंगणात उतरले आहेत. काही ठिकाणी बुजुर्ग सुद्धा या निवडणुकीत सामोरे जात आहेत.
तालुक्यातील ३६ ग्रामपंचायतींपैकी २८ ग्रामपंचायतची सार्वत्रिक निवडणुक होत असून २८ नोव्हेंबर ते शुक्रवारी २ डिसेंबर या कालावधीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी दोडामार्ग तहसीलदार अरुण खानोलकर यांसह नायब तहसीलदार नाना देसाई, संजय गवस निवडणूक शाखेचे पल्लवी पेडणेकर, हेमंत कुबल यांच्या मार्गदर्शनाखाली व योग्य नियोजनाने तहसीलदार कार्यालयाच्या पहिल्या मजल्यावर खुल्या सभागृहात २८ निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसहीत कर्मचाऱ्यांनी आपली जबाबदारी चोख पणे पार पाडली.
आता ५ तारीखला छाननी आणि ७ तारीखला उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा कालावधी असल्याने आपल्या विरोधकांना काही कागदपत्रांची त्रुटी सांगून आपल्या प्रतिस्पर्धी उमेदवारांचा काटा काढणे, व मागे घेण्याच्या दिवसांपर्यंत शक्य झाल्यास आपल्या विरोधक उमेदवारांची मनधरणी करणे याकडे उमेदवारांचा कल राहणार आहे. त्यामुळे नेमकं चित्र ७ तारीखलाच स्पष्ट होणार आहे.
दरम्यान तालुक्यातील केर-भेकुर्ली, मोर्ले व विर्डी या ग्रामपंचायत बिनविरोध करण्याबाबत काहींनी पुढाकार घेतल्याने या ग्रामपंचायतच्या निवडणूक होणार की त्या बिनविरोध होणार हे पाहणे सुद्धा औत्सुक्याचे ठरणार आहे.