मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेवर रवींद्र चव्हाण यांचं स्पष्टीकरण

Edited by: ब्युरो
Published on: December 01, 2024 15:22 PM
views 615  views

ब्युरो : मुख्यमंत्री कोण ? याच्या चर्चा झडत असताना आता आमदार आणि देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय रवींद्र चव्हाण यांचं नाव माध्यमातून समोर आलं. रवींद्र चव्हाण यांना दिल्लीत बोलावून घेण्यात आलं अशा बातम्या फिरत होत्या. मात्र यावर स्वतः रवींद्र चव्हाण यांनीच सोशल मिडीयावर पोस्ट करत या बातम्यांचं खंडन केलंय. 

चर्चा काय ? 

दिल्लीत जे.पी. नड्डा यांच्या निवासस्थानी विनोद तावडे आणि जे.पी. नड्डा यांच्यात जवळपास एक तास बैठक झाल्याची माहिती समोर आली होत.  तसेच विनोद तावडे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यात देखील मुख्यमंत्रिपदावरुन पुन्हा चर्चा झाल्याचं सांगण्यात येत होत.  यावेळी भाजपचे आमदार आणि देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय समजले जाणारे रवींद्र चव्हाण यांना देखील गुरुवारी दिल्लीत बोलावून घेतले. त्यामुळे भाजपच्या वरिष्ठांच्या मनात नेमकं काय सुरुय, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. 

आमदार रवींद्र चव्हाण यांना देवेंद्र फडणवीस यांनीच गुरुवारी दिल्लीत बोलावून घेतले होते. पालघर दौरा अर्धवट सोडून रवींद्र चव्हाण दिल्लीत गेले. भाजप सरचिटणीस विनोद तावडे यांच्यासोबत अमित शाह  यांची बैठक झाल्यानंतर बिगर मराठा मुख्यमंत्री केल्यास काय प्रतिक्रिया उमटेल, याची चाचपणी पक्षश्रेष्ठींनी जेली.  त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या नावाबाबत आक्षेप असेल तर रवींद्र चव्हाण यांना संधी द्यावी, अशी खेळी खेळली जाऊ शकते. अशा बातम्या समोर येत होत्या. 

रवींद्र चव्हाण काय म्हणाले ?

गेल्या २-३ दिवसांपासून मी माझ्या डोंबिवली मतदारसंघातच आहे. सद्यस्थितीत डोंबिवलीकरांच्या भेटीगाठी घेत त्यांच्याशी संवाद साधत आहे. या दोन दिवसात किंवा काल मध्यरात्री कुठल्याही वरिष्ठ नेत्यांच्या भेटीसाठी दिल्ली अथवा अन्य ठिकाणी गेलेलो नाहीये. त्यामुळे कृपया प्रसार माध्यमांनी कोणत्याही प्रकरणाची शहानिशा करून बातम्या चालवाव्यात, ही नम्र विनंती !