पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचा 'जनता दरबार'

२५ ते २७ सप्टेंबर दरम्यान आयोजन
Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: September 23, 2024 08:10 AM
views 434  views

 सिंधुदुर्गनगरी : सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न तात्काळ सोडविणे, जनता व प्रशासन यांच्यामध्ये समन्वय साधणे तसेच जनतेच्या विकासाच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करणे अशा विविध समाजोपयोगी हेतुसाठी पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या संकल्पनेतून ऑगस्ट महिन्यात 'जनता दरबार' चे आयोजन करण्यात आले होते. या जनता दरबाराला सामान्य नागरिकांचा मिळालेला प्रतिसाद लक्षात घेता २५ ते २७ सप्टेंबर दरम्यान पुन्हा एकदा पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली 'जनता दरबाराचे आयोजन करण्यात आलेले आहे. हा जनता दरबार सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत नियोजन सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, ओरोस- सिंधुदुर्ग येथे पार पडणार आहे. 

 २५ सप्टेंबर रोजी कणकवली विधानसभा क्षेत्रातील कणकवली, देवगड व वैभववाडी या तालुक्यातील नागरिकांच्या तक्रारी स्विकारल्या जाणार आहेत. दि. २६ सप्टेंबर रेाजी कुडाळ विधानसभा क्षेत्रातील कुडाळ व मालवण आणि दि २७ सप्टेंबर रोजी सावंतवाडी विधानसभा क्षेत्रातील सावंतवाडी, वेंगुर्ला आणि दोडामार्ग तालुक्यातील नागरिकांच्या तक्रारी स्विकारल्या जाणार आहेत. जनता दरबारामध्ये उपस्थित होणाऱ्या तक्रारी, अडचणींचे निराकरण करण्याच्या दृष्टीने जबाबदार अधिकारी उपस्थित राहणार आहेत. तरी नागरिकांनी जनता दरबारामध्ये आपल्या तक्रारी सादर करण्याचे आवाहन पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी केले आहे.