सिंधुदुर्ग विकसित जिल्हा म्हणून पुढे येईल : रविंद्र चव्हाण

Edited by: विनायक गांवस
Published on: August 09, 2024 13:49 PM
views 206  views

सावंतवाडी : बाहेरून येणारा पर्यटक इथे कसा थांबेल ? यासाठी सर्वांनी प्रयत्न करणं आवश्यक आहे. सिंधुदुर्गच्या जवळ चिपी व मोपा अशी दोन विमानतळ आहेत. याचा फायदा घेण गरजेचं आहे‌. सिंधुदुर्गची ओळख बदलण्याची गरज आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, खास.नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली निश्चितच हा जिल्हा विकसित जिल्हा म्हणून पुढे येईल असा विश्वास सार्वजनिक बांधकाम तथा पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी व्यक्त केला. सावंतवाडी येथील रेल्वे स्थानके सुशोभीकरण लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते.

मंत्री रविंद्र चव्हाण म्हणाले, गेली अनेक वर्षे ज्याची प्रतिक्षा होती असे विषय मार्गस्थ होत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली सर्वसामान्यांसाठी आम्ही कार्यरत आहोत. हे सरकार सर्वसामान्यांच आहे हे कृतीतून आम्ही सिद्ध केलं आहे‌. माझ्या मंत्रीपदाचा उपयोग सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी केला. संपूर्ण महाराष्ट्रात गेल्या दोन वर्षांत निधी उभारला. महाराष्ट्राची सेवा करण्यासाठी 92 हजार कोटींच्या कामाला मंजुरी व कामाला सुरुवात केली. साडेपाच कोटी रुपये रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी दिले. कोकण रेल्वेने  दिलेल्या परवानगीमुळे त्याचा बाह्य भाग बदलू शकलो‌. कोकणातील 12 रेल्वे स्थानकांच रूपडं पालटण्यात आलं. सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून घोषित केल्यानंतर नारायण राणे यांनी गोव्याशी कशी स्पर्धा करता येईल याचा विचार केला. पर्यटन दृष्ट्या गोवा सदन होऊ शकतो तर सिंधुदुर्ग ही होऊ शकतो. इथल स्थलांतर थांबविण्यासाठी सरकारच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवण आवश्यक आहे असं मत श्री. चव्हाण यांनी व्यक्त केले.

सिंधुदुर्ग जिल्हा स्वच्छतेसाठी महाराष्ट्रातील एक नंबर आहे. पर्यटनाला हवा असलेला गुण आपल्याकडे आहे. यात आणखीन सुधारणा करणं आवश्यक आहे. लोकप्रतिनिधी व गावातील सरपंच यांनी स्मार्ट व्हिलेज ही पंतप्रधानांची संकल्पना राबविण्यासाठी प्रयत्न करावेत. आपलं गाव वेगळ्या पद्धतीने जगात कसं पोहचेल यासाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे. आजच्या युगात ग्लोबल असण आवश्यक आहे असं मत यावेळी व्यक्त केले.