
सावंतवाडी : सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टरांची कमतरता आणि वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे रुग्णांचे होणारे मृत्यू यामुळे सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव यांनी आता कोणतीही आंदोलने किंवा उपोषणे करणार नसल्याचे जाहीर केले आहे. रुग्णांच्या आरोग्याबद्दल कोणालाही गांभीर्य नसल्यामुळे आंदोलन करून उपयोग नाही, असे त्यांचे म्हणणे आहे.
गेल्या काही दिवसांपासून सावंतवाडी रुग्णालयात अनेक दुर्दैवी घटना घडल्या आहेत. अपघातात जखमी झालेल्या तरुणांना वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे त्यांना प्राण गमवावे लागले. तसेच, निपाणी येथील २३ वर्षांच्या तरुणाला हृदयविकाराचा झटका आल्यावर तो रुग्णालयात चालत आला, मात्र त्यावेळी फिजिशियन उपलब्ध नसल्याने त्याचाही मृत्यू झाला. अशा अनेक घटना घडत असतानाही प्रशासनाचे किंवा राजकीय मंडळींचे लक्ष नाही, असे जाधव यांनी म्हटले आहे.
रवी जाधव म्हणाले की, "गेली सहा वर्षे सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान रुग्णांना २४ तास सेवा देत आहे. मात्र, डोळ्यासमोर रुग्णांना जीव गमावताना पाहून वेदना होतात. आम्ही फक्त रुग्णांना सेवा देऊ शकतो, पण त्यांचा जीव वाचवू शकत नाही. ते काम डॉक्टरांचे आहे. पण इथे डॉक्टरच उपलब्ध नाहीत."
स्थानिक नेते गंभीर नाहीत
स्थानिक राजकारणी फक्त आपले नाव मोठे करण्यात व्यस्त आहेत, पण सावंतवाडीतील आरोग्य समस्येबद्दल कोणीही गंभीर नाही. त्यामुळे हे येथील नागरिकांचे दुर्दैवच असल्याचे जाधव यांनी म्हटले आहे. डॉक्टरांची वाट पाहत कधी रुग्णालयात तर कधी गोव्याला जाताना रस्त्यातच रुग्ण दगावतात, हे दुर्दैवी वास्तव आहे.
समिती सदस्यपदाचा राजीनामा
सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानकडून रुग्ण कल्याण नियमक समिती सदस्य पदाचा लवकरच राजीनामा दिला जाईल, अशी घोषणा रवी जाधव यांनी केली आहे. ज्या ठिकाणी रुग्णांना योग्य उपचार मिळत नाहीत, तिथे अशा समितीवर राहण्याचा आपल्याला हक्क नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. मात्र, रुग्णांना सेवा देण्याबाबत प्रतिष्ठानकडून कोणतीही कमतरता केली जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.