महावितरणच्या कोकण प्रादेशिकस्तरीय नाट्यस्पर्धेत रत्नागिरीचे 'डबल गेम ' प्रथम

Edited by: विनायक गांवस
Published on: April 28, 2024 05:03 AM
views 136  views

रत्नागिरी : महावितरणच्या कोकण प्रादेशिक विभाग अंतर्गत आंतरपरिमंडलीय नाट्यस्पर्धेत रत्नागिरी परिमंडलाच्या 'डबल गेम' या नाटकाने सांघिक नाट्यनिर्मिती प्रथम क्रमांकासह वैयक्तिक गटात सहा पारितोषिके पटकावली. 'एकेक  पान गळावया'  या प्रकाशगड,मुंबई मुख्यालयाच्या नाटकास द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक ‍मिळाले. महावितरणचे  संचालक (संचालन तथा मानव संसाधन) अरविंद भादीकर यांचे हस्ते  पारितोषिक वितरण करण्यात आले. रत्नागिरीतील स्वातंत्र्यवीर वि.दा.सावरकर नाट्यगृहात तीन दिवसीय नाट्यस्पर्धा संपन्न झाली.

या समारंभप्रसंगी बोलताना भादीकर म्हणाले की, दैनंदिन कामातून थोडा विरंगुळा मिळून, ताणतणाव मुक्त होण्यासाठी कर्मचाऱ्यांना ऊर्जितावस्थेकडे नेण्यासाठी वार्षिक क्रीडा व नाट्यस्पर्धांचे आयोजन करण्यात येते. नाट्यस्पर्धेच्या निमित्ताने कलेच्या संवर्धनासोबत वीज कर्मचाऱ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळून आपसातील संवाद, सहभाग व सांघिक भावना वाढीस लागते. या स्पर्धेत सहभागी होऊन सर्वांनी दर्जेदार कला सादर केली. रसिकांना मनमुराद आनंद दिला. यातून तुम्ही सर्वजण विजयी ठरले आहात. उत्कृष्ट नियोजनाबाबत रत्नागिरी परिमंडलाचे कौतुक भादीकर यांनी केले.

याप्रसंगी संयोजक तथा मुख्य अभियंता परेश भागवत, मुख्य अभियंता दीपक कुमठेकर (नाशिक परिमंडल), मुख्य अभियंता कैलास हुमणे (जळगाव परिमंडल), अधीक्षक अभियंता स्वप्नील काटकर, अधीक्षक अभियंता विनोद पाटील, नाट्य परिक्षक विश्वास पांगारकर, मंजुषा जोशी, प्रदीप तुंगारे यांची उपस्थिती होती. प्रास्ताविक,सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी अप्पासाहेब पाटील यांनी केले.

नाट्य परिक्षक विश्वास पांगारकर यांनी नाटय सादरीकरणातील बारकावे तपशिलवार पणे सांगितले.कलाकारांनी सर्वांगाने  भुमिका समजून घेऊन,अभ्यासून ते पात्र साकारावे. कथा, संवाद व पटकथा हा नाटकाचा आत्मा असतो. नेपथ्य, प्रकाशयोजना, पार्श्वसंगीत या सहाय्यभूत बाबी आहेत, त्याचा बडेजाव नसावा.आयुष्यात नाट्यकलेचा वेगवेगळ्या ठिकाणी उपयोग होत असतो, तो करुन घेता आला पाहिजे असेही श्री.पांगारकर म्हणाले.

मुख्य अभियंता दीपक कुमठेकर यांनी खुमासदार शैलीत मनोगत व्यक्त केले. नाटक जगता आले पाहिजे. ते  करणं सोपं नसते, जगणे त्याहून अवघड असते. तेंव्हा दैंनदिन कामकाज  करताना एकमेकांच्या  भुमिका   समजून घेतल्या पाहिजेत,असा मार्मिक सल्ला त्यांनी दिला. ते पुढे म्हणाले की, स्पर्धेतून कलेचा वारसा जपण्याचे काम सुरु आहे. सर्वांनी उत्कृष्ट सादरीकरण केले.बाल कलाकारांचे विशेष कौतुक आहे. संयोजक तथा मुख्य अभियंता परेश भागवत यांनी  महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी व्यवसायिक दर्जाची कला सादर केली, असे कौतुक करून स्पर्धेत सहभाग हेच यश असल्याचे ते म्हणाले. या स्पर्धेच्या स्मृती अंतरंगात साठून राहतील, असे भावोद्गार त्यांनी काढले.

वैयक्तिक गटात अभिनय (पुरुष) - प्रथम-  दुर्गेश जगताप (डबल गेम, रत्नागिरी)/ द्वितीय- किशोरकुमार साठे (एकेक पान गळावया, प्रकाशगड, मुंबई),अभिनय (स्त्री) - प्रथम- रेणुका सुर्यवंशी (द ग्रेट एक्सचेंज, नाशिक)/ व्दितीय - श्रद्धा मुळे (डबल गेम, रत्नागिरी),अभिनय उत्तेजनार्थ- अलका कदम  (एकेक पान गळावया, प्रकाशगड, मुंबई), मकरंद जोशी  (द ग्रेट एक्सचेंज, नाशिक), युगंधरा ओहोळ  ('म्याडम' , जळगाव ), दिपाली लोखंडे (ऑक्सिजन, कल्याण), डॉ. संदीप वंजारी ( ‘द रेन इन द डार्क’, भांडुप), अनुराधा गोखले (डबल गेम, रत्नागिरी)अभिनय बालकलाकार उत्तेजनार्थ - संयुक्ता राऊत, समर्थ जाधव, पूर्वा जाधव, शुभांगी भोई  ('म्याडम' , जळगाव ),दिग्दर्शन- प्रथम - राजीव  पुणेकर (डबल गेम, रत्नागिरी)/ द्वितीय – विनोद  गोसावी ( एकेक पान गळावया, प्रकाशगड, मुंबई),नेपथ्य- प्रथम - राजेंद्र  जाधव (डबल गेम, रत्नागिरी)/द्वितीय – संदेश गायकवाड (एकेक पान गळावया, प्रकाशगड, मुंबई),प्रकाशयोजना- प्रथम - अमोल जाधव(एकेक पान गळावया, प्रकशगड, मुंबई)/ द्वितीय –डॉ. प्रदिप निंदेकर, योगेश मांढरे ( ‘द रेन इन द डार्क’, भांडुप),पार्श्वसंगीत- प्रथम - नितीन पळसुलेदेसाई, राजीव पुणेकर (डबल गेम, रत्नागिरी)/ द्वितीय –देवेंद्र उंबरकर, अविनाश गोसावी ( ‘द रेन इन द डार्क’, भांडुप),रंगभूषा व वेशभूषा- प्रथम - हेमंत पेखळे (द ग्रेट एक्सचेंज, नाशिक) / द्वितीय –रविंद्र चौधरी, सचिन भावसार ('म्याडम' , जळगाव ) अशी पारितोषिके ‍ मिळाली.