
वेळणेश्वर : गुहागर तालुक्यातील महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालय, वेळणेश्वर येथील इन्स्ट्रुमेंटेशन अभियांत्रिकी विभाग, आयएसओआय आणि आयआयसी यांच्या संयुक्त विद्यमाने "इन्स्ट्रुमेंटेशन शाखेतील बदलत्या तंत्रज्ञानातील करिअरच्या अपार संधी" या विषयावर तज्ज्ञ व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.
या व्याख्यानासाठी OGM Engineering Pvt. Ltd. चे प्रोजेक्ट्स आणि ऑपरेशन्स संचालक श्री. गौतम माळी हे प्रमुख संसाधन व्यक्ती म्हणून उपस्थित होते. त्यांनी इन्स्ट्रुमेंटेशन अभियांत्रिकी क्षेत्रातील करिअरच्या विविध संधी, उद्योगातील नव्या तंत्रज्ञानाची माहिती तसेच विद्यार्थ्यांनी विकसित करावयाच्या कौशल्यांवर सविस्तर मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना या क्षेत्रातील नवनवीन आव्हाने आणि त्यांच्या समाधानासाठी आवश्यक कौशल्यांचा सखोल परिचय मिळाला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि स्वागत कार्यक्रम समन्वयक प्रा. प्रतिक्षा पाटील यांनी केले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. अविनाश पवार, विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थ्यांनी केले व शेवटी आभार प्रदर्शन करण्यात आले.










