
रत्नागिरी : कोकणातील प्रसिद्ध तीर्थस्थळ गणततीपुळे येथील समुद्रात, दिवाळी सुट्टीत पर्यटनासाठी आलेल्या, पुणे आणि रायगड येथील दोन कुटुंबातील दोन जण बुडाले. यामध्ये रायगड मधील कुटुंबातील चिमुकल्यास वाचवण्यात यश आले मात्र चिमुकल्याचे वडील बुडाले आहेत. हे.दिवाळी पर्यटन या दोन कुटुंबांसाठी जीवघेणे ठरले आहे.
शुक्रवार, ता.२४ रोजी सायंकाळी पुणे येथील निखील शिवाजी वाघमारे (वय १८) , गणपतीपुळेच्या समुद्रात बेपत्ता झाला होता. पोलिस आणि जीवनरक्षकांकडून रात्रभर शोध घेतल्यानंतर निखीलचा मृतदेह मालगुंड गायवाडी समुद्रकिनारी सापडला.
तर पेण रायगड येथील नितीन शंकर पवार (वय ३५) वर्षे हे त्यांचा अडीच वर्षांचा मुलगा आयांश याला घेऊन शनिवारी सायंकाळी समुद्रात उतरले असता लाटांमध्ये गुरफटून समुद्रात बुडाले. त्याचवेळी देवदूतासारखा धाऊन आलेल्या स्थानिक व्यावसायिक फोटोग्राफर रोहित चव्हाण यांनी प्रसंगावधान राखत आयांशला तातडीने बाहेर काढून वाचवले मात्र वडील नितीन पवार समुद्रात बेपत्ता झाले. अद्यापही त्यांचा शोध लागलेला नाही. पोलीस आणि जीवनरक्षक शोध घेत आहेत. दोन्ही घटनांचा जयगड पोलीस तपास करीत आहेत. लागोपाठ घडलेल्या या दोन घटनांमुळे या वाघमारे आणि पवार या दोन पर्यटक कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असून गणपतीपुळे परीसरात हळहळ व्यक्त होत आहे. पर्यटकांनी समुद्रात उतरताना जीवनरक्षकांकडून दिलेल्या सूचना गांभीर्याने घ्याव्यात असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.










