
मंडणगड : मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत पाणी अडवा, पाणी जिरवा या घोषवाक्याला साजेसा उपक्रम मंडणगड तालुक्यातील तोंडली गावात राबविण्यात आला. पंचायत समिती मंडणगड यांच्या माध्यमातून ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त सहभागातून ता.२५ ऑक्टोबर रोजी श्रमदान कार्यक्रमात तब्बल दहा बंधाऱ्यांचे बांधकाम पूर्ण करण्यात आले.
गावातील लहान थोर, तरुण, वृद्ध, महिला आणि पुरुष सगळ्यांनी खांद्याला खांदा लावून श्रमदान केले. ग्रामएकजुटीचे हे उदाहरण पाहून उपस्थित सर्वांनी कौतुक व्यक्त केले. ग्रामीण विकास व पंचायत राज विभागाच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या उपक्रमाने तोंडली गावात पाणी साठवण व भूजलपातळी वाढविण्याच्या दिशेने मोठे पाऊल उचलले आहे. या श्रमदान उपक्रमामुळे पावसाचे पाणी हंगामी शेती आणि जनावरांच्या उपयोगासाठी उपलब्ध राहणार असून, येणाऱ्या उन्हाळ्यात पाण्याची टंचाई कमी करण्यास मोठी मदत होणार आहे. या उपक्रमामुळे गावकऱ्यांमध्ये एकजूट, आत्मविश्वास आणि स्वावलंबनाची भावना अधिक दृढ झाली आहे. या श्रमदानात गटविकास अधिकारी सुनील खरात, सरपंच चंद्रभागा जाधव, ग्रामपंचायत अधिकारी अक्षय चोपडे, सदस्य दिलीप नागले, पायल घरवे, लक्ष्मी तांबिटकर, ग्रामीण अध्यक्ष प्रताप चिलबे, उपाध्यक्ष विलास होडबे, कार्याध्यक्ष संतोष सकपाळ, आशा सेविका संतोषी चव्हाण, मदतनीस विमल कदम, तंटामुक्त अध्यक्ष गंगाराम अंबडसकर, दिलिशा कळबटे, रोहिणी अंबडस्कर, शांताराम अंबडसकर, रमेश चव्हाण यांच्यासह तोंडली ग्रामस्थ, महिलांनी परिश्रम करीत सहभाग घेतला.










