
चिपळूण : वाशिष्ठी नदीचे पाणी शहरात घुसणे आणि शहरातून वाहणाऱ्या शिव नदीचे पाणी ओसंडून पूर येणे ही चिपळूणकरांसाठी काही नवीन बाब नाही. दर काही वर्षांनी पूरस्थितीला तोंड द्यावे लागते. मात्र, 2021 च्या महापुरात झालेली अतोनात जीवितहानी व कोट्यवधी रुपयांचे झालेले नुकसान हे शहरवासीय कधीही विसरू शकत नाहीत. या महापूरानंतर चिपळूण बचाव समितीने सलग 29 दिवस साखळी उपोषण करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते. त्यानंतर आमदार शेखरजी निकम यांच्या पुढाकारातून महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून वाशिष्ठी नदीतील गाळ काढण्याचे मोठे काम हाती घेण्यात आले. त्यातून मोठ्या प्रमाणात गाळ उपसा करण्यात आल्याने नदीची वहनक्षमता काही प्रमाणात वाढली.
मुरादपूर–शंकरवाडी परिसर हा प्रत्येक वेळी पूरपाण्याने जलमय होणारा भाग होता. या ठिकाणी पूर्वी असलेला नलावडे बंधारा पाडण्यात आला होता. परिणामी वाशिष्ठीचे पाणी थेट या भागात शिरून मोठ्या प्रमाणात हानी होत होती. याची दखल घेत आमदार शेखर निकम यांनी दोन वर्षांपूर्वी नलावडे बंधाऱ्याचे पुनर्निर्माण करण्यासाठी 20 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. कामाची सातत्याने पाठपुरावा करून वर्षभरात हा बंधारा पूर्णत्वास नेण्यात आला.
नागरिकांना मोठा दिलासा
गेल्या दोन दिवसांपासून चिपळूण शहर व परिसरात मुसळधार पावसाचा जोर असूनही शहरात पाणी शिरलेले नाही. विशेषतः मुरादपूर–शंकरवाडी परिसरात पूरपाणी न शिरल्याने स्थानिक नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. यामुळे चिपळूण शहर महापुराच्या तडाख्यातून सध्या सुरक्षित राहिले आहे.
नागरिकांचा कृतज्ञभाव
स्थानिक नागरिक म्हणतात, “पूर्वी पावसाच्या जोरदार सरी पडल्या की घराघरांत पाणी शिरायचे. मोठे आर्थिक व मानसिक नुकसान व्हायचे. पण यावर्षी नलावडे बंधाऱ्यामुळे आम्ही निर्धास्त आहोत. आमदार शेखर निकम यांनी घेतलेल्या पुढाकारामुळेच हे शक्य झाले.” नलावडे बंधाऱ्यामुळे मिळालेला हा दिलासा आगामी काळातही पूरस्थिती कमी करण्यास मदत करणार आहे, असा विश्वास व्यक्त केला जात असून चिपळूणकरांनी आमदार शेखर निकम यांचे आभार मानले आहेत.