रत्नागिरी जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष हिराभाई बुटाला यांचं निधन

Edited by: मनोज पवार
Published on: August 05, 2025 17:20 PM
views 44  views

खेड : राजकीय, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात अमिट ठसा उमटवणारे खेडचे ज्येष्ठ नेते, रत्नागिरी जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष, प्रियदर्शनी इंदिरा गांधी पुरस्कार सन्मानित, सहजीवन शिक्षण संस्थेचे दीर्घकाळ अध्यक्ष राहिलेले हिराचंद परशुराम ऊर्फ हिराभाई बुटाला (वय ८२) यांचे आज पुणे येथे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने खेड तालुक्याच्या सार्वजनिक जीवनातील एक दीपस्तंभ विझला आहे.

ते गेल्यानंतर मागे दोन मुलगे, सुना, नातवंडे, तीन भाऊ, तसेच बुटाला परिवाराचे विस्तृत वटवृक्ष उभे असलेले सामाजिक व व्यावसायिक आयुष्य आठवते. नवी मुंबईतील रेवमॅक्स कंपनीचे मालक आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय कौस्तुभ बुटाला यांचे ते वडील होत.

हिराभाई बुटाला यांनी आपल्या कार्याची सुरुवात खेडमधील किराणा व्यापारातून केली. परंतु व्यापारी चौकटीत स्वतःला सीमित न ठेवता, त्यांनी सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवत काँग्रेस पक्षात सक्रिय सहभाग घेतला. याच राजकीय प्रवासात त्यांनी १९८५ ते १९९० दरम्यान रत्नागिरी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष म्हणून कार्यभार सांभाळला. त्यांचा लोकांशी संवाद, नेतृत्वगुण, संघटन कौशल्य आणि शिस्तप्रियता यामुळे ते काँग्रेसच्या आधारस्तंभांपैकी एक मानले गेले.

त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील वैभवशाली क्षणांमध्ये नवी दिल्ली येथे प्रियदर्शनी इंदिरा गांधी पुरस्काराने त्यांचा सन्मान होणे, हे विशेष ठरले. त्यांच्या संपर्कसंपन्न व्यक्तिमत्त्वामुळे शरद पवार, पृथ्वीराज चव्हाण, कै. भाईसाहेब सावंत, कै. हुसैन दलवाई, कै. इंदिरा गांधी, कै. राजीव गांधी यांच्याशी त्यांचे अत्यंत जवळचे संबंध होते. परंतु केवळ राजकारण नव्हे, तर शिक्षण हेच परिवर्तनाचे साधन मानणाऱ्या बुटाला यांनी १९७३ साली सहजीवन शिक्षण संस्थेची मुहूर्तमेढ रोवली आणि त्यानंतर सलग ५२ वर्षे अध्यक्षपदावर कार्यरत राहून अनेक शैक्षणिक संस्थांची उभारणी केली. श्रीमान चंदुलाल शेठ हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, आय.सी.एस. महाविद्यालय, हिराचंद पर्शुराम बुटाला आय.टी. कॉलेज, मदनभाई सुरा इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट, सहजीवन प्रायमरी स्कूल ही त्यांची शैक्षणिक वारसा ठरली.

त्यांच्या निधनानंतर संस्थेच्या सर्व शाखांमध्ये श्रद्धांजली वाहण्यात आली आणि शालेय कामकाज बंद ठेवण्यात आले. त्यांच्या एच.पी. बुटाला किराणा दुकान, लक्ष्मी मसाले इंडस्ट्रीज, एचपी गॅस सर्व्हिसेस या व्यावसायिक स्थापनासुद्धा आज बंद राहिल्या. त्यांच्यावर नेरुळ येथील स्मशानभूमीत सायंकाळी अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी दशानेमा गुजर समाजाचे बांधव, विविध राजकीय पक्षांचे नेते, शिक्षणतज्ज्ञ, सामाजिक कार्यकर्ते, बुटाला परिवाराचे निकटवर्तीय, तसेच तालुक्यातील अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हिराभाई बुटाला हे केवळ एक नाव नव्हते, तर ते खेडच्या जडणघडणीचे एक अविभाज्य आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या जाण्याने खेड तालुक्याने एक तत्त्वनिष्ठ नेता, समाजाने एक हितचिंतक, शिक्षण संस्थांनी एक मार्गदर्शक, आणि कुटुंबाने आधारस्तंभ गमावला आहे.