
मंडणगड : आंबडवे लोणंद महामार्गावर राजेवाडी ते आंबवडे दरम्यानचे अंतरातील राष्ट्रीय महामार्गाचे निर्मीतीचे काम तीन वर्षे रखडलेले असल्याने नागरीकांना अडचणींना सामोरे जावे लागत असल्याने मंडणगड तालुका संघर्ष समितीचेवतीने प्रशासनास स्वातंत्र्यदिनी उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे.
२८ जुलैला समितीचे अध्यक्ष अरविंद येलवे यांनी, कार्याध्यक्ष भरत सरपरे, सल्लागार अभय पिचूर्ले, विश्वास सुखदरे, सदस्य अतुल पवार, महेद्र येलवे, रमेश चिखलकर, सिंकदर बुरूड आदी पदाधिकाऱ्या समवेत निवासी नायब तहसिलदार संजय गुरव यांची भेट घेऊन त्यांच्याकडे निवेदन सादर केले.
या निवेनदनातील माहीतीनुसार गेले तीन वर्ष मंडणगड तालुका संघर्ष समिती मार्फत राजेवाडी ते आंबवडे ह्या मंडणगड शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे काम अपूर्ण स्थितीत असल्याबाबतचे प्रशासनास वेळोवेळी निवेदन देण्यात आले. विषयासंदर्भात अद्याप समाधानकारक कार्यवाही झालेली नाही राष्ट्रीय महामार्गाचे काम खूप संथ गतीने सुरू आहे. रस्त्याचे काम सुरू असता भिंगळोली, शेनाळे, चिंचाळी, पन्हळी, म्हाप्रळ, पाचरळ या गावांमध्ये जुन्या व नव्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे झाले आहेत. खड्ड्यांमुळे स्थानिकांना प्रवास करणे देखील कठीण झाले आहे. पावसाळ्यात खड्ड्यांमध्ये पाणी व चिखल साचल्यामुळे आणि खड्डे दिसत नसल्याने अनेक दुचाकीस्वारांचा अपघात झाला आहे.
एस. टी. बस मधून प्रवास करताना अनेक वृद्ध लोक असतात. त्यांना सुद्धा खड्ड्यांमुळे प्रवास करताना खूप त्रास होतो. तसेच अपघातग्रस्त ठिकाणी सूचना फलक सुद्धा लावण्यात आलेले नाहीत. परंतु सामान्य माणसाला होणारा त्रास हा प्रशासन आणि कंत्राटदार यांच्या दृष्टीने महत्त्वाचा नाही असे दिसून येते आहे. गेले वर्षभर मंडणगड तालुका संघर्ष समिती मार्फत या विषया करिता सातत्याने पाठपुरावा केल्यानंतरही गतवर्षीच्या परिस्थितीत काही सुधारणा झाली असल्याचे जाणवते. महामार्गाचे काम करणाऱ्या कंत्राटदारावर आपणामार्फत योग्य ती कार्यवाही करून कंत्राटदाराचे नाव काळ्या सूचीत नोंदवावे. 10 ऑगस्ट 2025 पर्यत रस्त्यावरील खड्डे डांबरांने भरुन देण्याचे काम कंत्राटदारामार्फत करावे आणि गरजेच्या ठिकाणी सुचना फलक लावण्यात यावेत अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. कामे दिलेल्या वेळेत न झाल्यास १५ ऑगस्ट २०२५ रोजी मंडणगड तालुका संघर्ष समिती मार्फत भिंगळोली येथील तहसिल कार्यालयाचे समोर आमरण उपोषण करण्याचा इशाराही निवेदनात देण्यात आल आहे.