चिपळूण नगर परिषद कोकणात अव्वल

स्वच्छ सर्वेक्षण २०२४ मध्ये मिळवले राज्यात १४ वं व देशात ८७ वे मानांकन
Edited by: मनोज पवार
Published on: July 17, 2025 18:51 PM
views 100  views

चिपळूण : केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत नुकत्याच जाहीर झालेल्या स्वच्छ सर्वेक्षण २०२४ मध्ये चिपळूण नगर परिषद ने लक्षणीय यश संपादन केले असून महाराष्ट्रात १४ वा, तर कोकण विभागात प्रथम क्रमांक पटकावला आहे. देशपातळीवर एकूण ४५८९ नगर पंचायती, नगर परिषद व महापालिका संस्थांनी सहभाग घेतलेल्या या सर्वेक्षणात ५० हजार ते ३ लाख लोकसंख्या असलेल्या शहरांच्या गटात चिपळूण शहराला देशात ८७ वे स्थान मिळाले आहे.

चिपळूण नगर परिषदेमार्फत शहरात दररोज निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे १०० टक्के संकलन, ओला-सुका व घरगुती घातक कचऱ्याचे वर्गीकरण, त्यावर प्रक्रिया, मैला संकलन व त्याचे शास्त्रोक्त व्यवस्थापन, सार्वजनिक व सामुदायिक शौचालयांची नियमित स्वच्छता, तसेच शहर सफाई यासाठी सातत्यपूर्ण काम केले जात आहे. याशिवाय, नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात आले. केंद्र शासनाने नियुक्त केलेल्या त्रयस्त संस्थेमार्फत शहराचा आढावा घेण्यात आला होता. त्यामध्ये प्रत्यक्ष पाहणीबरोबरच नागरिकांकडून प्रतिक्रिया घेण्यात आल्या.

या मूल्यांकनाच्या आधारे चिपळूण शहरास ‘कचरा मुक्त शहर’ मानांकनात एक स्टार, तसेच ‘हागणदारी मुक्त शहर’ (ODF++) असे दुहेरी गौरव प्राप्त झाले आहेत. नागरिकांचा मिळालेला सकारात्मक प्रतिसाद आणि सहकार्य यामुळेच हे यश शक्य झाले, असे प्रशासनाने सांगितले.

स्वच्छ सर्वेक्षणाच्या यशस्वीतेमागे चिपळूण नगर परिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी श्री. विशाल भोसले यांचे प्रभावी नेतृत्व लाभले असून त्यांच्यासह प्रशासकीय अधिकारी श्री. मंगेश पेढांबकर, कार्यालय अधीक्षक श्री. रोहित खाडे, आरोग्य विभाग प्रमुख श्री. वैभव निवाते, आरोग्य निरीक्षक श्री. सुजित जाधव, शहर समन्वयक श्रीमती पूजा शिंत्रे, तसेच आरोग्य विभागातील कर्मचारी, मुकादम, सर्व स्वच्छतादूत आणि घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पातील सर्व कर्मचाऱ्यांचे योगदान मोलाचे ठरले. या यशाबद्दल नगर परिषद आरोग्य विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी, शहर समन्वयक, मुकादम, स्वच्छतादूत, तसेच माजी लोकप्रतिनिधींनी दिलेले सहकार्य यांचे विशेष कौतुक करण्यात येत आहे. मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी सांगितले की, “हे यश संपूर्ण शहराचे आहे. आगामी सर्वेक्षणामध्ये आणखी उंच मानांकन मिळावे यासाठी विविध स्वच्छता मोहिमा, नागरिकसहभाग वाढवणे, आणि घनकचरा व्यवस्थापनामध्ये नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात येणार आहेत. चिपळूण शहराचे नाव राज्य व देशपातळीवर उज्वल करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”

चिपळूणकर नागरिकांची सहकार्यभावना, नगर परिषद कर्मचाऱ्यांची तळमळ, आणि एकूणच शहराच्या स्वच्छतेविषयी असलेली सजगता यामुळेच हे यश शक्य झाल्याचे चित्र दिसून आले आहे. स्वच्छतेच्या दिशेने चिपळूणचा प्रवास प्रेरणादायी ठरत आहे.