मंडणगड तालुक्यातील साकव दुरुस्तींकडे दुर्लक्ष

कॉजवेही ठरत आहेत तोकडे
Edited by: मनोज पवार
Published on: July 17, 2025 16:43 PM
views 56  views

मंडणगड : मान्सुनचे कालावधीत ग्रामिण भागाचा रस्ते मार्गाने संपर्क प्रस्थापित रहावा या उद्देशाने नव्वदच्या दशकात मंडणगड तालुक्यात उभे करण्यात आलेले बहुतांश साकव प्रवासास धोकादायक स्थितीत आले असून अखरेच्या घटीका मोजत आहेत. दुसरीकडे ग्रामिण भागात वाडी कोंडचे दळणवळण लक्षात घेऊन किमान पाई चालत जाणाऱ्यांसाठी सुरक्षित प्रवास करता यावा याकरिता जुन्या साकवांची जागा कालसंगत कॉजवेंनी घेतली असली आहे. मात्र बदलत्या काळानुसार कॉजवेचे रुपांतर मोठ्या पुलात करण्याची गरज आहे. दरवर्षी पावसात गावोगावी नव्याने उभ्या कऱण्यात आलेल्या कॉजवेंवरुन वांरवार पाणी गेल्याने त्यांची परिस्थिति वाईट आहे.

त्यामुळे जनतेच्या प्रश्नाची तीव्रता  अधिक दिसून येते.  डोंगराळ भाग  व नद्या नाल्यांचे तुडुंब भरुन वाहणे लक्षात घेता काही ठिकाणचे जुने साकव आजही उपयुक्त आहेत. कारण डोंगर दऱ्यात राहणाऱ्या ग्रामस्थांना पाण्याची पातळी जास्त असताना या साकवांचा वापर करावा लागतो. तालुक्यात सर्वच गावे व वाड्या रस्त्याने गाडी मार्गास जोडल्या गेल्या आहेत.  हे खरे असले तरी गावातील अंर्तगत प्रामुख्याने स्मशानभूमी व ग्राम देवलायांकडे जाणाऱ्या पाय वाटांवर तसेचे दोन वाड्यांना जोडणाऱ्या पायवाटांवर आजही अनेक ठिकाणी साकवांचा वापर होतो. गेल्या दशकात साकवांचे रुपांतर कॉजवेमध्ये करण्यात आले असले तरी नदी नाल्यांमध्ये पाण्याची वाढणारी पातळी लक्षात घेता अधिक उंचीच्या पुलांचीही मागणी गावागातून होत आहे. त्यामुळे एकाच ठिकाणी जुना साकव व नवीन कॉजवे असतानाही वाहतूकीची अडचण होताना दिसून येते. त्यामुळे तालुक्यातील जुन्या साकव दुरुस्तीकडे संबंधीत यंत्रणांनी लक्ष देण्याची गरज आहे. तालुक्यात लहान मोठ्या दोनशेहून अधिक साकवांचा वापर रहदारीसाठी होत असल्याची माहीती पुढे आल्याने साकवांची उपयुक्तता लक्षात घेऊन त्यांना पुर्ववत करणे गरजेचे आहे.