
सावर्डे : लायन्स क्लब सावर्डे आयडियलच्या सन २०२५-२६ या लायनिस्टिक वर्षाच्या कार्याध्यक्ष, सचिव आणि कार्यकारी मंडळाच्या पदग्रहण व शपथविधी सोहळ्याचे केदारनाथ हॉल, सावर्डे येथे मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात आले. क्लबच्या स्थापनेपासून सेवाभावी कार्यांची भक्कम पायाभरणी करणाऱ्या संस्थापक अध्यक्ष डॉ. वर्षा खानविलकर, सचिव डॉ. रश्मी पाटील आणि खजिनदार सौ. मीरा पाध्ये यांच्यावर यावर्षी पुन्हा अध्यक्षीय जबाबदारी सोपवण्यात आली.
पदग्रहण अधिकारी अॅड. विजय जमदग्नी यांनी सर्व नव्या पदाधिकाऱ्यांना शपथ दिली. यावेळी झोन चेअरमन डॉ. कृष्णकांत पाटील उपस्थित होते. त्यांनी आपल्या मनोगतातून झोनमधील इतर क्लबसोबत एकत्रित सेवा प्रकल्प राबविण्याचे आवाहन केले. या सोहळ्यास लायन्स क्लब चिपळूण गॅलेक्सी व लायन्स क्लब चिपळूणचे मान्यवर पदाधिकारीही उपस्थित होते. त्यांनी नव्याने कार्यभार स्वीकारलेल्या मंडळाचे अभिनंदन करत भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
लायन्स क्लब सावर्डे आयडियलने नवीन वर्षाच्या प्रारंभापासूनच विविध समाजोपयोगी उपक्रमांची सुरुवात केली आहे. त्यामध्ये वृक्षरोपण व वृक्षदिंडी, मलेरिया जनजागृती मोहीम, शेतकऱ्यांना खत व अवजार वाटप, जिद्द मतिमंद शाळेस आर्थिक मदत, डॉक्टर व चार्टर्ड अकाउंटंट सन्मान सोहळा, दहावी-बारावी विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन, गुरू पूजन सोहळा, भात लावणी सहभाग असे विविध उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडले आहेत.