
रत्नागिरी : कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील खेड मधून सुरू होणारा पावसाळ्यातील एक हॉट पर्यटन स्थळ म्हणून विकसित झालेल्या रघुवीर घाट ढासळू लागला आहे. या ठिकाणी दररोज शेकडो वाहने हजारो पर्यटकांना घेऊन येत आहे. मात्र घाट रस्ता हजारो मीटर खोलीच्या दरीच्या बाजूने ढासळू लागला आहे. त्यामुळे पर्यटकांचे जीवन धोक्यात येऊ शकते. मात्र ही धोकादायक परिस्थिती उद्भवलेली असताना देखील बांधकाम खाते त्याकडे दुर्लक्ष करत आहेत. घाटात या ठिकाणी कोणत्याही सुरक्षेच्या उपाययोजना केलेल्या दिसत नसल्याने तातडीने लक्ष देण्याची मागणी होत हे. या घाटाच्या सदय स्थितीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अनुज जोशी यांनी.
कोयना धरण बांधल्यानंतर कांदाटी खोऱ्यातील शिंदी, वळवंण, आरव, मोरणी, उचाट, वाघीवळे, लामज, निवळी, अकल्पे, गाडीवली आदी सुमारे वीस ते पंचवीस गाव वाड्यांचा सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्याशी असलेला भौगोलिक संपर्क जलाशयामुळे तुटला होता. १९९०-९१ मध्ये खेड तालुक्यातून खोपी या गावातून या घाटाचे काम सुरु करण्यात आले.
१९९३ मध्ये घाटाचे काम पूर्ण झाल्यावर कांदाटी खोऱ्यातील रहिवाशांचा थेट खेड तालुक्याशी संपर्क प्रस्तापित झाला. या मार्गावर खेड- उचाट-अकल्पे ही बस सेवा २००२ मध्ये खेड आगारातून सुरू करण्यात आल्यामुळे येथील ग्रामस्थांचा दळण-वळणचा प्रश्न निकाली निघाला. रघुवीर घाट १२ किमी अंतराचा असुन या मार्गावर ७ ठिकाणे अत्यंत धोक्याची तसेच दरड प्रवण क्षेत्रात येतात. चार हजार मीटर उंची या घाटाची असून हा सह्याद्रीतील सर्वांत उंच घाटांपैकी एक घाट आहे. घाटाकडे होत असलेले दुर्लक्ष या घाटाच्या पलीकडे राहणाऱ्या लोकांच्या व पर्यटकांच्या अस्तित्वासाठी धोकादायक परिस्थिती बनवत आहे.