
कोकणसाद : रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेला सरत्या आर्थिक वर्षामध्ये ९४.६४ कोटी रुपयांचा ऐतिहासिक ढोबळ नफा झाला आहे. बॅंकेच्या ठेवी २८६६.८७ कोटी रुपये, कर्जव्यवहार २१९९.६३ कोटी असा ५०६६.५१ कोटी एकूण व्यवसाय झाल्याची माहिती बॅंकेचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे यांनी पत्रकार परिषदेत दिली. बॅंकेच्या प्रधान कार्यालयातील सभागृहात आज दुपारी पत्रकार परिषदेत डॉ. चोरगे यांनी बॅंकेचा लेखाजोखा सादर केला. बॅंकेचे कार्यक्षेत्र रत्नागिरी जिल्हा असून ९ तालुक्यांत ७६ शाखा, प्रधान कार्यालय असे विस्तारलेले आहे. २८ शाखा स्वमालकीच्या जागेमध्ये बॅंकेच्या बहुतांश शाखा ग्रामीण भागांतील सर्वांना सुविधा देत आहेत.
डॉ. चोरगे म्हणाले की, बॅंकेच्या गतवर्षीच्या तुलनेत ठेवींमध्ये २३०.७० कोटीने, कर्जव्यवहारात १९५.३४ कोटीने वाढ झाली आहे. बॅंकेच्या व्यवसायामध्ये ४२६.०४ कोटीने वाढ झाली. तसेच ढोबळ नफ्यामध्ये २६.११ कोटीने वाढ झाली आहे.
बॅंकेचा ढोबळ एनपीए २.९१ टक्के असून नक्त एनपीए ०.०० टक्के एवढा आहे. सलग १३ वर्षे हा एनपीए ०.०० टक्के असून सलग १४ वर्षे बॅंकेने अ ऑडिट वर्ग प्राप्त केला आहे. बॅंकेतर्फे ५० संगणक संच नव्या आर्थिक वर्षांत जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांना देण्यात येणार आहेत. सामाजिक बांधिलकी म्हणून बॅंकेने आपत्ती, उत्कृष्ट खेळाडू, अनाथ आश्रम, दिव्यांग मुलांचे वसतीगृह, शेतकरी कार्यशाळा आदी कारणांसाठी ५५.८५ लाख रुपये मदत केली आहे. मुदतीत पूर्णफेड करणाऱ्या प्राथमिक शेती सहकारी संस्थांना व थेट कर्जदारांना त्यांनी आर्थिक वर्षात एकूण दिलेल्या व्याजाच्या रक्कमेत ०.५० टक्के सवलत देण्यात आली आहे. बॅंकेला सरत्या आर्थिक वर्षात लोकसत्ता संघर्ष सर्वोत्कृष्ट मुख्य कार्यकारी अधिकारी अर्थविश्व पुरस्कार व भारतीय राष्ट्रीय सहकारी संघाचा बेस्ट इनोव्हेटीव्ह बॅंक ऑफ दि इयर अॅवॉर्डने गौरवण्यात आले.
पत्रकार परिषदेला उपाध्यक्ष बाबाजीराव जाधव, ज्येष्ठ संचालक अॅड. दीपक पटवर्धन, रमेश कीर, मुख्य कार्यकारी अधिकारी अजय चव्हाण, राजेंद्र सुर्वे, म. शं. टिळेकर आदींसह सर्व संचालक उपस्थित होते.
भागभांडवल ६८.९३ कोटी
स्वनिधी २७३.३५ कोटी
ठेवी २८६६.८७ कोटी
कर्जे २१९९.६४ कोटी
गुंतवणुका ११४१.०३ कोटी
खेळते भांडवल ३६१७.४६ कोटी
सीआरएआर ११.५७ टक्के
नक्त एनपीए ०.०० टक्के