रत्नागिरीत विधानसभेसाठी शक्तिप्रदर्शन करीत अर्ज दाखल

Edited by: मनोज पवार
Published on: October 24, 2024 14:35 PM
views 333  views

चिपळूण :  महाराष्ट्र विधानसभा निवडणुक नोव्हेंबर २०२४ मध्ये होणार आहेत.या निवडणुकीसाठी, चिपळूण-संगमेश्वर,  खेड-दापोली, गुहागर या मतदारसंघात इच्छुक असलेल्या विविध उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज आज , गुरुपुष्यामृताचा मुहुर्त साधत आपल्या मतदारसंघातील शासकीय यंत्रणेतील जबाबदार निवडणूक अधिकाऱ्यांकडे दाखल केले आहेत. 

चिपळूण - संगमेश्वर विधानसभा मतदारसंघात मिरवणूक काढत,महाविकास आघाडीकडून,  राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार प्रशांत यादव यांनी आज , आघाडीच्या नेत्यांच्या साक्षीने , प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांच्याकडे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. 

चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदार संघात,  राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे उमेदवार आमदार शेखर निकम यांच्या सोबत त्यांची लढत महाराष्ट्रात लक्षवेधी ठरणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदार संघात,चार जागा शिवसेना शिंदे गट विरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे अशी आहे . मात्र चिपळूण संगमेश्वर या एकमेव विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष अशी काटे की टक्कर होणार आहे.

तर त्यांच्या पत्नी आणि चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेच्या सीईओ सौ.स्वप्ना यादव यांच्याकडून डमी अर्ज दाखल करण्यात आला आहे.पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांच्या नेतृत्वाखाली चिपळूण पोलिसांचा चोख बंदोबस्त होता.

 गुहागर विधानसभा मतदारसंघातूून आमदार भास्कर जाधव यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. भास्कर जाधव हे महाविकास आघाडीकडून, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 'मशाल' चिन्हावर निवडणूक लढविणार आहेत. 

त्यांनी प्रथम गुहागर शिवाजी चौक येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मिरवणुकीने आपल्या गुहागर येथील कार्यालयाजवळ येऊन उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. त्यानंतर कार्यकर्त्यांसमवेत व्याडेश्वराचे सहपत्नी दर्शन घेतले. तिथून काही मोजक्याच कार्यकर्त्यां समवेत आमदार भास्कर जाधव यांनी गुहागर तहसील कार्यालय येथे निवडणूक निर्णय अधिकारी शिवाजी जगताप यांच्याकडे आपला उमेदवारी अर्ज सादर केला. त्यावेळी त्यांच्या समवेत पत्नी सुवर्णाताई जाधव, मुलगा समीर जाधव, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष पद्माकर आरेकर, आरपीआयचे सुभाष मोहिते आधी उपस्थित होते. नंतर त्यांनी बाहेर येऊन पत्रकारांशी संवाद साधला.

दापोली : गुरुपुष्यामृत योगाचा मुहूर्त साधून आज दापोली विधानसभा मतदारसंघ निवडणुकीसाठी २ उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी यांचेकडे सादर करण्यात आले. 

महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून शिवसेना (उद्धव बाळसाहेब  ठाकरे) पक्षाचे उमेदवार संजय कदम यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला तर त्यांचे प्रतिस्पर्धी म्हणून महायुतीचे उमेदवार म्हणून शिवसेनेचे योगेश कदम यांनीहि उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी तथा दापोलीचे उपविभागीय अधिकारी डॉ. अजित थोरबोले यांचेकडे आज सादर केला. 

महायुतीच्या वतीने दापोली शहरातील आझाद मैदान येथे प्रथम शक्ती प्रदर्शन करण्यात आले होते त्यात सुमारे ५ हजार कार्यकर्ते सहभागी झाले होते त्यात महिलांचा समावेश मोठ्या प्रमाणात होता. यावेळी राष्ट्रवादी, शिवसेना व आरपीआयचे पदाधिकारी होते, मात्र महायुतीमधील भाजपचा एकही पदाधिकारी उपस्थित नव्हता. आझाद मैदान येथून रॅलीने योगेश कदम उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे आले व तेथे त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांचेसोबत शिवसेना नेते व माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम, योगेश कदम यांच्या मातोश्री, बंधू, पत्नी, लहान मुलगी यांचा समावेश होता तसेच शिवसेना  तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेस व आरपीआय चे पदाधिकारी उपस्थित होते. 

उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना आ. योगेश कदम म्हणाले कि, या निवडणुकीत आपण ५० हजार पेक्षा अधिक मताधिक्य मिळवून विजयी होणार असल्याचा आपल्याला आत्मविश्वास आहे. आज सकाळी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अगोदर आपण भाजपचे नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन करून त्यांचे आशीर्वाद घेतले आहेत. आपल्याला विजयाची संपूर्ण खात्री आहे.