
सिंधुदुर्ग : रक्तदान किती महत्वाचं आहे, याची वेळोवेळी प्रचीती आपल्याला येते. हे रक्तदान अनेकांचा जीव वाचवू शकते. अशीच घटना पुन्हा एकदा घडली. नवजात बाळासाठी दांडेली आरोस येथील रसिक दळवी देवदूतच ठरलेत.
गोवा मेडिकल कॉलेज, बांबोळी इथं केवळ एक दिवसाच्या बाळाची स्थिती नाजूक बनली. त्या बाळाला किमान तीन युनिट फ्रेश रक्ताची तीही दुर्मिळ ओ निगेटिव्ह रक्ताची गरज भासली होती. GMC रक्तपेढीमधील डॉक्टरांनी ऑन कॉल रक्तदाते संस्थेला संपर्क साधला. परिस्थितीची माहिती दिली. याबाबतच वृत्त कळताच क्षणाचाही विलंब न करता रसिक दळवी यांनी GMC रक्तपेढी गाठत रक्तदान केलं. रसिक दळवी यांनी जपलेल्या सामाजिक भानामुळे एका जीवाचा जणू पुर्नजन्मच झाला. तत्यांचं हे रक्तदान करण्याची नववी वेळ आहे.
यासाठी बाळाच्या नातेवाईकांनी रसिक दळवी यांचे आभार मानले. रसिक दळवी यांच्यासारख्या रक्तदात्यांचा आम्हाला अभिमान असल्याची प्रतिक्रिया ऑन कॉल रक्तदाते संस्थेचे अध्यक्ष दयानंदजी गवस यांनी दिली. रसिक दळवी यांनी दाखवलेली तत्परता कौतुकास पात्र ठरलीय.