ओरोसमध्ये आढळले मूर्तीवरील शिलालेखाचे दुर्मिळ उदाहरण

अभ्यासक सतीश लळीत यांची माहिती
Edited by:
Published on: April 04, 2026 12:06 PM
views 536  views

सिंधुदुर्गनगरी :  शिलालेख हे इतिहासाच्या अभ्यासाचे एक मुख्य साधन आहे. मात्र देवतेच्या मूर्तीवर सहसा शिलालेख आढळत नाही. असे असताना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओरोस बुद्रुक येथील सातेरी मंदिर परिसरातील क्षेत्रपाल मंदिरात असलेल्या महिषासुरमर्दिनीच्या मूर्तीवर दिनांक आणि नाममुद्रा असलेला १४२ वर्षांपूर्वीचा शिलालेख आढळून आला आहे. ही बाब अतिशय दुर्मिळ आहे, अशी माहिती पुरातत्व आणि मूर्तीशास्त्राचे अभ्यासक सतीश लळीत यांनी दिली आहे.

याबाबत माहिती देताना श्री. लळीत म्हणाले की, ओरोस बुद्रुक गावातील जि.प. शाळा क्र. १च्या जवळ सातेरी देवीचे मंदिर आहे. जवळच अन्य दोन छोटी मंदिरे आहेत. यापैकी श्री देव क्षेत्रपाल या मंदिरात क्षेत्रपाल व वंश देवतांच्या जोडीनेच महिषासुरमर्दिनीची सुमारे दोन फुट उंचीची काळ्या पाषाणातील सुबक मूर्ती आहे. या मूर्तीवर देवीच्या मागच्या डाव्या हातामागे स्पष्ट कोरलेला एक शिलालेख आढळून आला आहे. 'ता. २९ मे स. १८८४ रामजी कुमया च्यारी' असा हा लेख आहे. यात २९ मे १८८४ हा काळाचा स्पष्ट उल्लेख इंग्रजी सनानुसार असून 'रामजी कुमया च्यारी' हे व्यक्तीनाम कोरलेले आहे. कदाचित या तारखेला या मूर्तीची प्रतिष्ठापना झाली असावी व रामजी कुमया च्यारी नावाच्या दानशूर भाविक व्यक्तीने ही मूर्ती दान केली असावी, असा अर्थ यातून निघू शकतो. मूर्ती मंदिरात असल्याने ती आणि शिलालेख अत्यंत सुरक्षित असून कोणतीही झीज झालेली नाही, असे दिसून येते.

 क्षेत्रपाल देवता ही ग्रामीण भागात सर्रास आढळणारी देवता आहे. ही देवता जमीन, शेत किंवा विशिष्ट भौगोलिक प्रदेशाची रक्षक देवता मानली जाते. गावाच्या किंवा जमिनीच्या सीमांचे दुष्ट शक्तींपासून संरक्षण करणे हे त्यांचे कार्य आहे. सामान्यतः हे शिवाचे स्वरूप (भैरव) मानले जाते. शेतजमीन किंवा वास्तूच्या रक्षणार्थ क्षेत्रपाल देवतेला पूजले जाते. 'क्षेत्र' (जमीन/जागा) अधिक 'पाल' (रक्षक) जमिनीचे रक्षण करणारा असा त्याचा अर्थ आहे. क्षेत्रपाल अनेकदा भैरव, म्हसोबा किंवा स्थानिक ग्रामदेवतेच्या रुपातही आढळतो. शेती पेरणीपूर्वी, गृहप्रवेशावेळी किंवा नवीन जमीन घेताना क्षेत्रपालाची पूजा करण्याची प्रथा आहे. क्षेत्रपाल हे ग्रामदेवता आणि कुलदेवता यांच्याशी संबंधित असून, त्यांना जमिनीचे रक्षक दैवत मानले जाते. अशा या क्षेत्रपाल मंदिरात महिषासुरमर्दिनीची ही मूर्ती स्थापित करण्यात आली आहे, हे विशेष आहे, अशी माहिती श्री. लळीत यांनी दिली.

संपूर्ण भारतात देवी किंवा शक्तीपूजा केली जाते. याबाबतची कथा अशी आहे की, निरनिराळी रूपे घेऊन आदिशक्तीने चंड, मुंड, शुंभ, निशुंभ, वगैरे राक्षसाचा संहार केला. त्यात महिषासुराचा संहार करणारी जी देवी तिला दुर्गा असे म्हणतात. रंभ नांवाच्या असुराला महिषीपासून अग्नीच्या प्रसादाने झालेला मुलगा महिषासुर होय. याने ब्रह्मदेवाची आराधना केली. त्याच्या इच्छेप्रमाणे त्याला अमरत्व मिळाले नाही, पण एवढी सूट मिळाली की त्याचे मरण स्त्रीशिवाय दुसऱ्याच्या हातून होणार नाही. स्त्री ही त्याकाळी अबला समजली जात असल्यामुळे आपणास कोठेही भीती नाही, असे समजून महिषाने पराक्रम गाजविण्यास सुरुवात केली आणि देवांना सगळीकडून हुसकावून लावले, तेव्हा ब्रह्मा, विष्णू व शंकराच्या नेतृत्वाखाली सर्व देवांनी आपापल्या संमिलित तेजाने एक स्त्री उत्पन्न केली. हीच महाशक्ती होय. हिचे निरनिराळ्या रुपाने वर्णन मिळते. हिनेच पुढे महिषासुराचा वध केला व दैवी संपत्ती आणि समृद्धीची पुनर्स्थापना केली. तिचे वाहन सिंह असून तो तिला हिमालयाकडून मिळाला आणि निरनिराळी आयुधे ही वेगवेगळ्या देवांकडून मिळाली, अशी धारणा आहे. भारतात साधारणपणें महिषमर्दिनी दुर्गेची आराधना केली जाते. आदि शंकराचार्यानी रचलेले 'अयि गिरिन्दिनि नंदितमेदिनि विश्वविनोदिनि नन्दिनुते । जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥' हे २१ कडव्यांचे महिषासुरमर्दिनी स्तोत्र अतिशय प्रसिद्ध आहे.

क्षेत्रपाल मंदिरातील महिषमर्दिनी दुर्गेची मूर्ती स्थानक प्रकारचा (उभी) आणि चतुर्भुज आहे. मूर्तीच्या मागे नक्षीयुक्त प्रभावळ असून मध्यभागी वर कीर्तिमुख कोरले आहे. करंडकमुगुटाने आणि माफक दागिन्यांनी ती सुशोभित आहे. किरीटकुंडले अतिशय देखणी आहेत. चारही हातात कंकणे आहेत. गळ्यात पुतळ्यांची माळ ठळकपणे दिसत आहे. उजव्या मागील हातामध्ये तलवार असून डाव्या मागील हातामध्ये ढाल आहे. पुढील उजव्या हातात खांड असून तिने ते महिषाच्या शरीरात खुपसले आहे. पुढील डाव्या हाताने महिषाची जीभ पकडली आहे. डाव्या पायाने तिने महिषाला दाबून धरले आहे. मूर्तीच्या अगदी खाली फुले आणि वेलींची नक्षी पहायला मिळते. ही मूर्ती सिंहविरहित आहे. देवीच्या वस्त्राची किनार नक्षीने अंकित करण्यासाठी मूर्तीकाराने खुप मेहनत घेतली आहे, असे निरीक्षण श्री. लळीत यांनी मांडले आहे.