प्रशासकीय यशाकडून सामाजिक कृतज्ञतेकडे

'जिल्हाधिकारी स्पर्धा परीक्षा अभ्यासिके'च्या विद्यार्थ्यांचा आदर्श उपक्रम
Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: April 08, 2026 11:28 AM
views 29  views

सिंधुदुर्गनगरी : जिल्हाधिकारी स्पर्धा परीक्षा अभ्यासिका, सिंधुदुर्ग ही केवळ अधिकारी घडवणारी खाण नसून, संवेदनशील समाजसेवक घडवणारे केंद्र असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून, याच अभ्यासिकेतून कठोर परिश्रम घेऊन विविध शासकीय विभागांत उच्च पदांवर रुजू झालेल्या माजी विद्यार्थ्यांनी 'क्षयरोगमुक्त भारत' अभियानांतर्गत एक अत्यंत स्तुत्य पाऊल उचलले आहे. प्रशासकीय सेवेत यश मिळवल्यानंतर आपल्या यशाचा आनंद सामाजिक ऋणातून साजरा करण्यासाठी या विद्यार्थ्यांनी प्रत्येकी एका क्षयरुग्णाला दत्तक घेऊन 'निक्षय मित्र' म्हणून जबाबदारी स्वीकारली आहे.

हा विशेष कार्यक्रम जिल्हा क्षयरोग केंद्र, सिंधुदुर्ग येथे मान्यवरांच्या उपस्थितीत अत्यंत उत्साहात पार पडला.

अधिकारी बनल्यानंतरही जपली सामाजिक बांधिलकी

स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना अनेक विद्यार्थी गरिबी, संघर्ष आणि अपयशाचा सामना करतात. मात्र, 'जिल्हाधिकारी स्पर्धा परीक्षा अभ्यासिके च्या शिस्तीत तयार झालेल्या या विद्यार्थ्यांनी पद मिळाल्यानंतर समाजाला विसरले नाहीत. सरकारी सेवेत रुजू झाल्यानंतर आपल्या पहिल्या काही पगारांतून समाजातील अत्यंत दुर्लक्षित असलेल्या क्षयरुग्णांना आधार देण्याचा त्यांचा निर्णय कौतुकास्पद ठरत आहे.

निक्षय मित्र बनून सामाजिक बांधिलकी जपणारे 'जिल्हाधिकारी अभ्यासिके'चे यशस्वी विद्यार्थी:

 1. **तृप्ती टेमकर** - सहाय्यक संचालक तथा जिल्हा कोषागार अधिकारी, चंद्रपूर

 2. **एकादशी कोंबे** - जिल्हा व सत्र न्यायालय, सिंधुदुर्ग

 3. **सागर शिरसाट** - कृषी विभाग सिंधुदुर्ग 

 4. **आदेश घाडी** - जिल्हा पुरवठा विभाग, सिंधुदुर्ग

 5. **किरण गोसावी** - जिल्हा कोषागार विभाग, सिंधुदुर्ग

 6. **सचिन जधर** - वित्त विभाग, कोल्हापूर

 7. **नितेश पाताडे** - कृषी सहाय्यक मालवण

 8. **प्रथमेश केरकर** - GST विभाग, मुंबई

प्रशासकीय अधिकाऱ्यांचे मोलाचे मार्गदर्शन

कार्यक्रमाच्या वेळी उपस्थित असलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या विद्यार्थ्यांच्या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले.

  जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. हर्षल जाधव  यांनी सांगितले की, " भारत क्षयरोगमुक्त करण्याचे उद्दिष्ट गाठण्यासाठी केवळ औषधोपचार पुरेसे नाहीत, तर रुग्णांना सकस आहाराची आणि समाजाच्या मानसिक आधाराची गरज आहे. अभ्यासिकेतील या मुलांनी घेतलेला पुढाकार इतर तरुण पिढीसाठी दिशादर्शक आहे."

 जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. सुधीर धनगे  आणि सांख्यिकी अधिकारी निकेत जाधव सर यांनीही या विद्यार्थ्यांच्या सामाजिक जाणिवांचा गौरव केला.

अभ्यासिकेच्या संस्कारांचे फलित

या विद्यार्थ्यांच्या यशात 'जिल्हाधिकारी स्पर्धा परीक्षा अभ्यासिके'चा मोठा वाटा आहे. अभ्यासाच्या काळात मिळालेले मार्गदर्शन आणि शिस्त यामुळेच आज हे तरुण विविध जिल्ह्यांत आणि महत्त्वाच्या विभागांत कार्यरत आहेत. "ज्या जिल्ह्यातून आम्ही घडलो, त्या जिल्ह्याच्या आरोग्य संवर्धनासाठी काहीतरी करता येणे, हे आमचे भाग्य आहे," अशा भावना या नवनियुक्त निक्षय मित्रांनी व्यक्त केल्या.

'निक्षय मित्र' मोहिमेचे महत्त्व

पंतप्रधान टीबी मुक्त भारत अभियानांतर्गत, निक्षय मित्र हे दत्तक घेतलेल्या रुग्णाला दरमहा पोषण कीट (Nutritional Kit) पुरवतात. क्षयरुग्णाला औषधांसोबतच प्रथिनांची (Protein) अत्यंत आवश्यकता असते. या विद्यार्थ्यांच्या या मदतीमुळे आठ रुग्णांच्या आरोग्यात सुधारणा होण्यास मोठी मदत होणार आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाच्या वतीने आणि आरोग्य विभागाच्या वतीने या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले असून, त्यांच्या या कार्याचा आदर्श राज्यातील इतर स्पर्धा परीक्षा केंद्रांनी घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.