
कणकवली : शहरात विविध रंगांची उधळण आज रंगपंचमी उत्साहात साजरी करण्यात आली. या रंगपंचमीने येथील शिमगोत्सवाची परंपरागत पध्दतीने सांगता झाली. रंगपंचमी खेळताना बच्चे कंपनीबरोबरच तरुणाईचाही उत्साह दांडगा होता. कणकवली फौजदारवाडी येथील लहान मुलांनी वेगवेगळ्या वेशभूषा धारण करून गोमूचा नाच करत रंगपंचमी साजरी केला. शहरामध्ये गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी रंगपंचमी साजरी केली जाते.
कणकवली शहरात आज दुपारी १ वाजण्याच्या सुमारास रंगपंचमीला सुरुवात झाली. तर सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास प्रथेप्रमाणे ढोल वाजल्यावर ही रंगपंचमी थांबविण्यात आली. त्यानंतर श्री रवळनाथ मंदिराजवळील गाव होळी जवळ परंपरागत पध्दतीने काही धार्मिक विधी पार पड़ल्यानंतर शिमगोत्सवाची सांगता करण्यात आली.










