कणकवलीत रंगपंचमीनिमित्त होणार जल्लोष

समीर नलावडे-गोट्या सावंत मित्रमंडळाने यावर्षी रंगपंचमीच्या निमित्ताने रंगोत्सव 2023 या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे आयोजन केले आहे.
Edited by: उमेश बुचडे
Published on: March 10, 2023 18:39 PM
views 160  views

कणकवली : कणकवली शहराची रंगपंचमी 21 मार्च रोजी होणार असून, यावर्षी या रंगपंचमीच्या निमित्ताने रंगोत्सव 2023 या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे आयोजन कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे मित्र मंडळ व माजी जि. प. अध्यक्ष गोट्या सावंत मित्रमंडळ यांच्या वतीने करण्यात आले आहे. कणकवली शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक पुतळ्यासमोरील फ्लाय ओव्हर ब्रिज खाली चौकात हा रंगोत्सव 21 मार्च रोजी दुपारी 1 ते सायंकाळी 5 या वेळेत साजरा केला जाणार आहे. ह्या रंगोत्सवासाठी वेगवेगळ्या रंगांची उपलब्धता या आयोजकांकडूनच उपलब्ध केली जाणार आहे. या कालावधीत रंगांची उधळण करत असतानाच डीजेच्या तालावर बेधुंद गाण्यांचा आस्वाद देखील कणकवली शहरवासीयांना लुटता येणार आहे. तसेच मालवण येथील शुक्रतारा हा बॅन्जो साज देखील यावेळी वाद्यवृंदासह डीजेच्या साथीला असणार आहे. डीजेच्या साथीनेच रंगपंचमीचा उत्सव देखील खेळता येणार आहे. या रंगोत्सवात कणकवली शहरवासीयांनी, महिला, तरुण, तरुणी या सह सर्वच स्तरातील लोकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन नगराध्यक्ष समीर नलावडे व माजी जि. प. अध्यक्ष गोट्या सावंत यांनी केले आहे.