
सिंधुदुर्गनगरी : रानबांबूळी ते जिल्हा मुख्यालय जोडणारा महत्त्वाचा रस्ता पूर्णपणे खड्डेमय झाला असून प्रवाशांसह रुग्णांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. शासनाने या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी तब्बल १ कोटी रुपये मंजूर केलेले असतानाही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निष्क्रियतेमुळे रस्त्याचे काम रखडले आहे.
कसाल–मालवण मुख्य रस्त्याद्वारे जिल्हा मुख्यालयाकडे येणाऱ्या रुग्णवाहिका, खासगी वाहने तसेच जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी येणारे रुग्ण खड्डेमय रस्त्यामुळे अक्षरशः हालअपेष्टा सहन करत आहेत. मोठ्या खड्ड्यांमुळे दुचाकीस्वारांचा तोल जात असून पावसात खड्ड्यात साचलेल्या पाण्यामुळे फोरव्हिलर गाड्यांमधून उडणारे पाणी थेट अंगावर घेत नागरिक त्रस्त झाले आहेत.
जिल्हा रुग्णालय, जिल्हा मेडिकल कॉलेज तसेच जिल्हा मुख्यालयाकडे जाणाऱ्या या रस्त्याची दुरावस्था अतिशय दयनीय असून प्रशासन आणि लोकप्रतिनिधी याकडे दुर्लक्ष करत आहेत. गेल्या आर्थिक वर्षात मंजूर झालेला कोटी रुपयांचा निधी नेमका कुठे गेला? हा सवाल नागरिकांकडून उपस्थित होत आहे. बांधकाम विभागाच्या नाकर्तेपणामुळे जिल्ह्यातील हा महत्त्वाचा रस्ता आजही खड्ड्यात अडकून पडला आहे. ‘याकडे अखेर लक्ष कोण देणार?’ असा संतप्त स्वर नागरिकांतून उमटत आहे.










