
देवगड : मिठबाव - येथील रामेश्वर हायस्कूल मिठबाव चे एस.एस. सी. बॅच 1989 चे विद्यार्थी 35 वर्षानंतर हायस्कूल मध्ये भेटले. 14 मे रोजी या स्नेहभेटी च्या कार्यक्रमाचें आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी असणारे शिक्षक वृंद यांना सन्मानपूर्वक कार्यक्रम स्थळी आणण्यात आले. प्रथम संस्थापक डॉ.शिरोडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून सर्वांनी अभिवादन केले. त्यानंतर गुरुवार्यांवर पुष्पवृष्टी करत त्यांचे सभागृहात स्वागत करण्यात आले. कैलासवासी मित्र व गुरुवर्य यांना सर्वप्रथम श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. नंतर नंदकुमार सोमण सरांचा व त्यांच्या पत्नीचाही सत्कार करण्यात आला. कोल्हापुर वरून खास या कार्यक्रमास उपस्थितीत असणारे मोमीन सर व त्यांच्या पत्नी या दोघांचाही शाल, श्रीफळ बुके व स्मृतिचिन्ह देवून सत्कार करण्यात आला.
त्यानंतर उपस्थित सर्व मित्र मैत्रिणींचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. मोमीन सरांनी उत्कृष्ट असे मनोगत व्यक्त केले. त्यात त्यांनी काही आठवणींना उजाळा दिला. त्यानंतर सोमण सरांनी आपल्या खास शैलीत मार्गदर्शन केले. अनेक अनुभव कथन केले व सर्वांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. मुख्याध्यापक श्री. राऊत यांनी संस्था व प्रशालेच्या वतीने सर्वांचे आभार व्यक्त केले व या उपक्रमाचे कौतुक केले.
त्यानंतर सुगंधा बिर्जे, मनिषा कदम, सुचित्रा नातू, नथू धुरत, विद्या मेहंदळे, संदीप हिंदळेकर, डॉ.राजेश राजम, बाळू परब, ममता पारकर यांनी आपली मनोगते व्यक्त केली. त्यातून त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.राजेश राजम आणि विद्या मेहंदळे यांनी केले. त्यानंतर सर्वांनी स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला व गुरुवर्यांना निरोप दिला. नंतर सर्व मित्र मैत्रिणींकडून केक कापून सुगंधा बिर्जे आणि ममता पारकर या दोघांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. त्यावेळी सर्वांच्या वतीने त्यांना एक भेटवस्तू देण्यात आली.
त्यानंतर एका दिमाखदार सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विद्या मेहंदळेच्या प्रार्थनेने कार्यक्रमाची सुरूवात झाली. संदीप हिंदळेकरच्या सुरेल आवाजास सर्वांनीच साथ दिली. डॉ.राजेश राजम यांनी मैत्री वरील एक गाणे माऊथ ऑर्गन वर वाजवले, तसेच संपूर्ण कार्यक्रमास हार्मोनियमची साथ दिली. मिलिंद कातवणकर, संदीप हिंदळेकर व विनायक कुबल यांनी ढोलकीची साथ दिली.
त्यानंतर एका फनी गेमचे आयोजन करण्यात आले होते. यात वनिता खेडेकर हिने प्रथम क्रमांक पटकावला. तिला एक पारितोषिक देण्यात आले. येत्या काही दिवसात शाळेस या बॅच कडून एक भेटवस्तू देण्यात येणार आहे. तसेच एका गरजू मैत्रिणीस आर्थिक मदत करण्यात आली. त्यानंतर तांबळडेगच्या समुद्र किनाऱ्यावर सर्व मित्र मात्रिणींनी एकत्र पणे धमाल, मस्ती करून जुन्या आठवणींना उजळा दिला. हा दिवस सर्वांसाठीच अविस्मरणीय ठरला, अशा भावना सर्वांनी व्यक्त केल्या.