
दोडामार्ग : दोडामार्ग शहरात हार्डवेअरचा व्यवसाय करणारे युवा उद्योजक राजेश राजन गावडे, वय २९ याचे सोमवारी सकाळी आकस्मित निधन झाले आहे. गेल्या काही वर्षांपासून त्यांनी दोडामार्ग शहरातील सावंतवाडा येथे आपला हार्डवेअरचे दुकान घातले होते. राजेश हे मूळ तळवडे ता. सावंतवाडी येथील असून दोडामार्ग शहर ही त्यांच्या मामाचे गाव आहे. शहर परिसरात व तालुक्यात त्यांना भैया या नावाने सर्व ओळखत होते. आपल्या मनमिळावू स्वभावाने त्यांनी आपल्या धंद्यात जम बसविला होता.
सोमवारी सकाळी त्यांना बर वाटत नसल्याने दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र रुग्णालयातच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच त्यांचे नातेवाईक, मित्रपरिवार, व्यापारी यांनी दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात गर्दी केली होती. त्यांच्या या आकस्मित निधनाने शहर परिसरात शोककळा पसरली होती. दोडामार्ग रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. त्यांच्या पश्चात आई वडील, बहीण असा परिवार आहे. शिक्षण विभागातील सेवानिवृत्त केंद्रप्रमुख गुरुदास कुबल, उद्योजक आबू कुबल, ॲड. भुवन कुबल यांचे ते भाचा होत.