
सावंतवाडी : महाराष्ट्र प्रदेश सुवर्णकार संघाचा भव्य मेळावा 12 मे रोजी पुणे येथे संपन्न झाला. संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील सुवर्णकार या मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित होते. या मेळाव्यामध्ये समाजासाठी काम करणाऱ्या सुवर्णकारांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष म्हणून राजेश पनवेलकर या मेळाव्याला उपस्थित होते. या कार्यक्रमामध्ये श्रीपाद दत्तात्रय पनवेलकर ज्वेलर्सचे मालक राजेश श्रीपाद पनवेलकर यांची महाराष्ट्र प्रदेश सुवर्णकार संघाच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.
सिंधुदुर्ग जिल्ह्याला महाराष्ट्र प्रदेश पातळीवर प्रथमच हे पद मिळाले आहे. राजेश पनवेलकर हे सिंधुदुर्ग जिल्हा सुवर्णकार संघाचे जिल्हाध्यक्ष असून ते अनेक वर्ष समाज हितासाठी आणि सामाजिक कार्यात देखील अग्रेसर आहेत. समाजामध्ये होणाऱ्या लोकोपयोगी कार्यक्रमांमध्ये त्यांच्या नेहमीच सहभाग असतो. जिल्ह्यातील सुवर्णकारांना भेडसावणारे प्रश्न सोडवण्यासाठी तसेच शासन स्तरावर एखादा प्रश्न सोडवण्यासाठी ते नेहमी पुढे असतात. समाजाप्रती असलेली तळमळ आणि समाजाच्या विविध उपक्रमांमध्ये त्यांचा असलेला सहभाग, दानशूरपणा, संकटकाळी धावून जाण्याची वृत्ती यामुळेच त्यांना हे पद देण्यात आले आहे. सावंतवाडी रोटरी क्लबचे अध्यक्षपद देखील त्यांनी सांभाळले आहे.
राजेश श्रीपाद पनवेलकर यांची महाराष्ट्र प्रदेश सुवर्णकार संघाच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांना समाजाच्या आणि मित्र परिवाराच्यावतीने भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.