
वेंगुर्ला : शिरोडा बाजारपेठेतील व्यापाऱ्यांची आणि नागरिकांची महाविकास आघाडीचे उमेदवार राजन तेली यांनी भेट घेत चर्चा केली. यावेळी श्री. तेली यांच्या प्रचारार्थ शहरात जोरदार शक्तिप्रदर्शन करत रॅली काढण्यात आली. यावेळी उपस्थितांनी केसरकर यांच्या विरोधात जोरदार रोष व्यक्त करत तेली यांच्यासोबत असल्याचा विश्वास व्यक्त केला.
यावेळी जितेश कामत, प्रविण धानजी, सुधाकर राणे, सुहास निकम, नामदेव राणे, रोहित पडवळ, प्रथमेश परब यांच्यासह मोठय़ा संख्येने महिला पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित असल्याचे सांगण्यात आले. यावेळी रेडी आजगाव शिरोडा शहर उभादांडा आदी भागांत बैठकाही घेण्यात आल्या. कोण आला रे कोण आला, शिवसेनेचा वाघ आला., आवाज कुणाचा - शिवसेनेचा, तेली साहेब तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है अशा घोषणांनी शिरोडा शहर दणाणून गेले. तर तळागाळात काम करणारे उमेदवार श्री. तेली रिंगणात आहेत त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करत महाविकास आघाडी सरकार आणूया असा निर्धार उपस्थितीतातून करण्यात आला.