
कणकवली : आमदार निलेश राणे यांनी कणकवली नगरपंचायतीची जबाबदारी घेऊन प्रभागनिहाय प्रचारही केल्याने ही निवडणूक शहर विकास आघाडी साठी सोपी झाली आहे. शहर विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संदेश पारकर व नगरसेवक पदाच्या सर्व उमेदवारांना मतदारांचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळत आहे. त्यामुळे कणकवलीत शहर विकास आघाडीच जिंकेल, असा विश्वास माजी आमदार राजन तेली यांनी व्यक्त केला.
येथील निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत श्री. तेली बोलत होते. यावेळी उबाठा शिवसेना कणकवली विधानसभाप्रमुख सतीश सावंत, शिंदे शिवसेनेचे उपनेते संजय आंग्रे, उपजिल्हाप्रमुख शेखर राणे, भास्कर राणे आदी उपस्थित होते.
निलेश राणेंमुळे कार्यकर्त्यांंमध्ये उत्साह
राजन तेली म्हणाले कणकवली शहर विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संदेश पारकर व नगरसेवक पदाच्या सर्व उमेदवारांना मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. याबाबत आम्ही आमदार निलेश राणेंचे आभार मानतो कारण त्यांनी कणकवली नगरपंचायत निवडणुकीची जबाबदारी घेतली व प्रभागनिहाय प्रचार करत रंगत आणली.साहजिकच प्रत्येक कार्यकर्त्यामध्ये मोठा उत्साह आला असल्याने ही निवडणूक आम्हाला आता सोपी झाली आहे.
कणकवलीचा रोडमॅप जाहीर करणार
तेली पुढे म्हणाले, उदय सामंत यांचेही मी आभार मानतो. कारण जिल्ह्यातील निवडणुकांच्या अनुषंगाने ते रोज रिपोर्ट घेत आहेत. राज्याचे नगर विकास खाते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे असून त्यांच्यासह देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून कणकवली शहरात येत्या काळात मोठा विकास निधी येणार आहे. निवडणूकचिन्ह बुधवारी मिळेल, त्यानंतर दोनच दिवसांमध्ये कणकवली शहराचा रोड मॅप आम्ही जाहीर करणार आहोत, असेही तेली म्हणाले.
नारायण राणेंनंतर निलेश राणेंचेच नेतृत्व
कणकवलीची निवडणूक आता जनतेने हातात घेतली आहे. शहर विकास आघाडी व आमचे नेते निलेश राणे यांना येथे मिळणारा पाठिंबा लक्षात घेता शिंदे शिवसेनेचे आणखी नेते इथे यायला हवेत, अशी आवश्यकता वाटत नाही. कारण 1990 साली नारायण राणे असताना होते तसेच वातावरण आज कणकवलीत दिसत आहे. नारायण राणेंच्या नंतर फुलणारे नेतृत्व म्हणून निलेश राणेंकडे सर्वजण पाहत आहेत. निलेश राणे हेच सध्या सर्वांचे आकर्षण आहेत. निलेश राणे यांनी आमच्या प्रभागांमध्ये किमान दहा मिनिटांसाठी भेट द्यावी अशी कणकवली शहरातील प्रत्येक प्रभागातील नागरिक आता मागणी करू लागले आहेत.
निलेश राणेंची नागरिकांना ग्वाही
कणकवली शहरामध्ये आजही मूलभूत समस्यांची वाणवा आहे. प्रचाराच्या निमित्ताने शहरातील शिवाजीनगर, बांधकरवाडी या भागांमध्ये फिरलो असता तेथे अद्यापही विजेची समस्या असल्याचे दिसले. याबाबत स्थानिक नागरिकांनी निलेश राणे यांचेही लक्ष वेधले. कणकवली शहराच्या ग्रामीण भागातील वीजप्रश्न सिंधू रत्न योजनेच्या माध्यमातून सोडविला जाईल. या योजनेच्या माध्यमातून मंजूर ट्रान्सफॉर्मर आहेत, ते येथे दिले जातील, अशी ग्वाही निलेश राणे यांनी नागरिकांना दिली आहे, असेही तेली म्हणाले.
निलेश राणे सर्वांना सोबत घेऊन जाणारा नेता
कणकवलीची निवडणूक आम्ही विकासाच्या मुद्द्यावर लढवत आहोत. चांगली ड्रेनेज सिस्टम, गार्डन, नाट्यगृह व्हावे अशी आमची भूमिका आहे. मालवणमध्ये शिंदे शिवसेनेच्या सर्व उमेदवारांनी शपथ घेतली आहे. घराच्या अथवा घर दुरुस्तीच्या परवानगीसाठी कोणी आले असल्यास त्यांना अडवायचे नाही. तर अडवणाऱ्याचा फक्त व्हिडिओ करून आम्हाला पाठवा, आम्ही कारवाई करू,असे आश्वासन निलेश राणे यांनी दिले आहे. अर्थात निलेश राणे यांनी सर्वसामान्यांना दिलासा दिला आहे. हाच दिलासा त्यांनी काल कणकवलीतही येऊन दिला आहे. त्यामुळे निलेश राणे हे सगळ्यांना सोबत घेऊन कार्यरत राहणारे आहेत अशी खात्री कार्यकर्त्यांना पटली आहे, असेही तेली म्हणाले.
निलेश राणेंमुळे कणकवलीत परिवर्तन
सतीश सावंत म्हणाले, निलेश राणे यांच्या आमदारकीच्या कार्यकाला आता एक वर्ष पूर्ण झाले आहे. या वर्षभरात त्यांनी कुडाळ आणि मालवणमध्ये विकासकामांचा धडाका लावला आहे. विशेष म्हणजे कणकवली शहराचे पालकत्व त्यांनी स्वीकारले आहे. त्यामुळे जनतेचाही त्यांच्यावर विश्वास आहे. अर्थातच कणकवलीत तीन डिसेंबरला परिवर्तन झालेले दिसेल, असे सावंत म्हणाले.
निलेश राणे पालकमंत्री होणार?
यावेळी राजन तेली म्हणाले, निलेश राणे यांनी शिवसेनेत दाखल झाल्यानंतर संघटनात्मक विकासात्मक कामावर भर दिला. जुने नवे अशा सगळ्यांना एकत्र घेऊन ते आता जिल्ह्यातील चारही निवडणुकांना सामोरे गेले आहेत. काल कणकवलीत आलेले मंत्री उदय सामंत यांनी एक सुतवाच केले की, येणाऱ्या काळात मंत्रिमंडळात बदल होतील व सिंधुदुर्गचा पालकमंत्री हा शिंदे शिवसेनेचा असेल. अर्थात पालकमंत्री दीपक केसरकर होतील किंवा निलेश राणे, मात्र आमचा आग्रह आहे की सिंधुदुर्गची जबाबदारी निलेश राणेंकडे द्यावी. याबाबत आम्ही एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केली असल्याचे तेली म्हणाले.










