
कणकवली : माजी आमदार राजन तेली यांनी सिंधुदुर्ग मध्यवर्ती सहकारी बँकेतील गैरव्यवहारांबाबत गंभीर इशारा दिला आहे. ते म्हणाले की, शेतकऱ्यांची बँक असताना परप्रांतीयांना कोट्यवधींचे कर्ज दिले गेले असून जिल्हा बाहेरील साखर कारखान्यांना ९०० कोटींचे कर्ज देण्यात आले आहे.
राजन तेली यांनी बुधवारी कणकवलीत पत्रकार परिषदेत सांगितले की, जिल्हा बँक नाबार्डच्या ऑडिट अहवालात काही गंभीर बाबी समोर आल्या आहेत. रॉकस्टार कंपनीस १५–१६ कोटी, तसेच इतर व्यक्तींना मोठ्या प्रमाणात कर्ज दिले गेले आहे. स्विझरलँड अभ्यास दौऱ्यावर ६५ लाख खर्च केल्याबाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.
सिंधुदुर्ग मध्यवर्ती सहकारी बँकेचा मी कर्जदार आहे. मी जी कर्ज घेतलीत या कर्जाचे पहिली २ वर्षे फक्त व्याज भरायचे होते. कर्जाची मुदत १२ वर्षे असून २०३३ सालापर्यंत आहे. तरी देखील मला त्रास देण्याच्या हेतूने कणकवली पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे. लाचलुचपत विभागाकडे तक्रार करुन मला त्रास देण्याचा प्रयत्न सुरु आहे. मात्र, येत्या आठ दिवसांत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना या प्रकरणांची आपण माहिती देणार असून बँकेतील सर्व प्रकरणांची पोलखोल करणार आहे, असं ठणकावलं आहे. तसेच जिल्हा बँकेत काम करणाऱ्या अधिकारी वर्गाने आपले हित लक्षात ठेवावे, कारण “बँक टिकली तर अधिकारीही टिकतील,” असा टोलाही त्यांनी लगावला आहे. राजन तेली यानी काही जमिनी उद्योग उभारण्याच्या नावाने कंपन्यानी घेतल्या आहेत. मात्र त्यांच्या परवानगीचा कालावधी संपला असताना कर्ज वाटप करण्यात आलेय. अशा अनेक बाबींचा आपण पोलखोल करणारच. यां सर्वामागे आका कोण? असा सवाल उपस्थित करत राजन तेली यांनी आपल्यावर एक नव्हे १० फौजदारी गुन्हे दाखल करा. मात्र आपण पोलखोल करणारच असा ईशारा त्यांनी दिलाय.