उद्योजक राजन आंगणे यांचं निधन !

Edited by: विनायक गावस
Published on: March 18, 2024 15:43 PM
views 1153  views

सावंतवाडी : उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते राजन वामन आंगणे वय ६०, रा. कारिवडे, मूळ आंगणेवाडी,मालवण यांचे आज सोमवार रोजी दुपारी ४ च्या दरम्यान हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. दुपारी ते आपल्या कारिवडे भैरववाडी येथील क्रशर लगत असलेल्या निवासस्थानी विश्रांती घेत असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला. यातच त्यांचे निधन झाले. सायंकाळी पाचच्या सुमारास त्यांच्या कामगारानी ते घराबाहेर आले नसल्यानं पाहिले असता त्यांची हालचाल नसल्याच निदर्शनास आल. यानंतर त्यांना उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, त्याआधीच त्यांचे निधन झाले असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले. 


त्यांच्या निधनाची माहिती मिळताच सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात राजकीय, सामाजिक तसेच उद्योग व्यवसाय क्षेत्रासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी धाव घेतली. गोरगरिबांचा कैवारी असलेल्या एका दिलदार व्यक्तिमत्त्वाला मुकलो अशी भावना व्यक्त करण्यात आली. राजन आंगणे हे सावंतवाडी कारिवडे येथील निवासस्थानी ते एकटेच राहत असत. त्यांच्या पश्चात भाऊ, भावजया, पुतणे, पुतण्या असा मोठा परिवार आहे. त्यांचे पार्थिव मालवण आंगणेवाडी येथील त्यांच्या मुळ घरी नेण्यात येणार असून तेथेच त्यांच्या पार्थीवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली.