राजकोटवरील शिवरायांच्या पुतळ्याबाबतची संजय लिंगवत यांची पोस्ट चर्चेत

Edited by: विनायक गावस
Published on: December 07, 2023 19:46 PM
views 941  views

सिंधुदुर्ग : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे राजकोटवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. ३५ फुटी उंच असा पुतळा उभारण्यात आला आहे. मात्र, कोकण इतिहास परिषद सिंधुदुर्गचे सदस्य तथा इतिहास अभ्यासक डॉ.संजीव लिंगवत यांनी यावर सोशल मिडियाच्या माध्यमातून भाष्य केलं आहे. आजपर्यंत मी पाहिलेल्या कुठल्याही पुतळ्यातील चैतन्य माननीय पंतप्रधान यांच्या हस्ते काल आरमार दिनाच्या निमित्ताने अनावरण करण्यात आलेल्या  राजकोट, सिंधुदुर्गवरील या पहिल्या छायाचित्रातील भारतीय आरमाराचे जनक, संपूर्ण जगाचं प्रेरणास्थान आणि महाराष्ट्राचे दैवत असलेल्या शिवरायांच्या पुतळ्यात मला दिसत नाही असं मत त्यांनी व्यक्त केल आहे. सध्या सोशल मिडियावर या पोस्टची चांगलीच चर्चा असून कमेंट बॉक्समध्ये विचारवंतांच विरारमंथन सुरु आहे. 



या पोस्टमध्ये डॉ. लिंगवत म्हणालेत,  आपल्या भावनांचा आदर आहेच.पण माफी असावी,राग नसावा. आजपर्यंत मी पाहिलेल्या कुठल्याही पुतळ्यातील चैतन्य माननीय पंतप्रधान यांच्या हस्ते काल आरमार दिनाच्या निमित्ताने अनावरण करण्यात आलेल्या  राजकोट, सिंधुदुर्ग वरील या पहिल्या छायाचित्रातील भारतीय आरमाराचे जनक, संपूर्ण जगाचं प्रेरणास्थान आणि महाराष्ट्राचे दैवत असलेल्या शिवरायांच्या पुतळ्यात मला दिसत नाही. छायाचित्रातील पुण्यातील वाकड येथील पुतळा, शरद कृषी भवन, ओरोस येथील पुतळा किंवा मोपा विमानतळावर जाताना गोव्यात पेडणे तालुक्यातील वारखंड गावातील तरुण मंडळाने बसविलेला पुतळा, किंवा सावंतवाडी तालुक्यातील मळगाव , ओटवणे, विलवडे सारख्या चिमुकल्या गावांतील पुतळे एकदा  निरखून पहा. अशा  महाराष्ट्र राज्यातील कितीतरी पुतळ्यांच निरिक्षण करा, साध्या गडहिंग्लज शहरातील छत्रपती शिवाजी  चौकातील भव्य दिव्य पुतळा पहा. यापेक्षा नक्कीच चैतन्यमयी वाटतात.


माझं मत म्हणजे नक्कीच  राजकारण नाही. हा शिवरायांचा अभिमान आहे. खरं तर या पुतळ्याच्या अलिकडेच पालकमंत्री यांच्या हस्ते झालेल्या पायाभरणी समारंभात मी उपस्थित होता. एकुण काम खूप घाईगडबडीत झालं. राजकोटवर पुतळा असणं ही नक्कीच सुंदर कल्पना होती व आहे. तरीही ,या पुतळ्याच्या बाबतीत अभ्यास होणे आवश्यक होतं व आहे . हा पुतळा पाहताना, आजवर मी  पाहिलेली सगळ्यात चुकीच्या प्रकारे तयार केलेली  महाराजांची मूर्ती असल्याचे निदर्शनास येते. हातातील तलवार संपूर्ण पणे चुकीच्या पद्धतीने लावलेली आहे. राजकारण एवढे माजले आहे की इथे प्रत्येक गोष्टीत महाराष्ट्र द्वेष दिसून आला आहे असं वाटतं.

सरदार वल्लभभाई पटेल यांची प्रतिमा जगतील सर्वात उंच साकारून गुजरातचे महत्व कसे वाढेल यावर बरोबर नियोजन केले आहे ते चांगले देखील आहे. पण मग महाराष्ट्रात मात्र काहीही केले तरी इथली जनता मात्र सहन करते असे गृहीत धरूनच सर्वकाही केले आहे. अखंड हिंदुस्थानचे दैवत असलेले आपले महाराज यांच्या प्रतिमेची उभारणी अशा पद्धतीने करून काय साध्य केले आहे. प्रत्येक गोष्टीत हा महाराष्ट्र द्वेष का..?? राजे तर अखंड हिंदुस्थानचे होते ना मग इथे तेवढी आत्मीयता का दाखवली नाही.


करायचं म्हणून करतात त्याना माहितेय विरोध करायला कोणी नाहीय आणि जर केलाच तर तो हिंदू विरोधी ठरतो मग. काही एक फरक पडत नाही या लोकांना. शिल्पकार कोणत्या निकषांवर निवडले होते? त्यांची निवड नक्की कुणी केली? कोणतेही मोठे शिल्प बनवताना आधी त्याची मास्टर कॉपी तयार केली जाते, ती तपासून मग मूर्ती तयार करतात. ती पूर्ण प्रक्रिया झाली की नाही? जगातील विश्व गुरू , ते महाराष्ट्र राज्यातील तीन तीन मर्द मराठे नेते उपस्थित असताना शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार घालण्याची व्यवस्था का करण्यात आली नाही ? भारतातील सशस्त्र आरमार दाखल असतानाही 

हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी व पुष्पहार अर्पण  करता आला नसता काय ? असे एक ना हजार प्रश्न हा शिवरायांचा पुतळा पाहिल्यावर पडतात. ह्यांना सिंहासानधिश्वर  किंवा अश्वरूढ महाराजांची मूर्तीची ऍलर्जी आहे का? या सगळ्या गोष्टींचा अभ्यास होणे आवश्यक आहे. आणि सोबत सिंधुदुर्गनगरीच्या प्रवेशद्वारावरील अश्वारूढ पुतळ्याची देखभाल , दुरुस्ती व सुशोभीकरण होणे आवश्यक आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याला" सिंधुदुर्ग " नाव देत असताना या सगळ्या गोष्टींचा गांभीर्याने विचार करण आवश्यक आहे. एका बाजूला शिवरायांच्या पराक्रमाचे शाळेतील धडे काढून टाकण्याच्या विषयाकडे जाणुनबुजून दुर्लक्ष करायचा, अर्थात शिवरायांचे विचार व पराक्रम अडगळीत ठेवायचा व दुसऱ्या बाजूला शिवरायांचे अभ्यास न करता पुतळे उभारून राजकारण करायचे अशी दुपट्टीपणाची भूमिका गेली वर्षानुवर्षे देशात चालू आहे. हे नक्कीच शिवप्रेमी  , मावळ्यांनी, नवयुवका व महाराष्ट्रातील तमाम जनतेचे विचार करण्याजोग आहे असं मत त्यांनी व्यक्त केल आहे. 


सध्या सोशल मिडियावर या पोस्टची चांगलीच चर्चा असून या पोस्टच समर्थन व विरोध करणाऱ्या कमेंट्स विचारवंतांसह शिवप्रेमींकडून केल्या जात आहेत.