
सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा राज्य सरकारी कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या तज्ञ संचालक पदी संस्थेचे माजी अध्यक्ष भाग्यवंत उर्फ राजा वाडीकर यांची निवड करण्यात आली. रविवारी झालेल्या संचालक मंडळाच्या मासिक सभेमध्ये संस्थेच्या अध्यक्ष वर्षा मोहिते व उपाध्यक्ष दिनेश खवले यांनी पुष्पगुच्छ देऊन श्री. वाडीकर यांचे स्वागत केले. या सभेला संचालक कृष्णा आडणेकर, प्रवीण सावंत, राजेश चव्हाण, विलास चव्हाण, देविदास आडारकर, बाळकृष्ण रणसिंग, अनघा तळावडेकर, वासुदेव वरावडेकर, राजेंद्र शिंगाडे, अमित गंगावणे, सचीव निलेश कुडाळकर, लेखापाल पावसकर उपस्थित होते.
भाग्यवंत वाडीकर यांनी सन २०१५ ते २०२३ या कालावधीत संस्थेचे संचालक म्हणून काम केले आहे. जानेवारी २०२१ ते डिसेंबर २०२३ पर्यंत ते संस्थेच्या अध्यक्षपदी होते. आपल्या अध्यक्षपदाच्या काळात सर्व संचालकांना सोबत घेऊन त्यांनी संस्थेच्या हिताचे बरेच निर्णय घेतले. सभासदांना देण्यात येणाऱ्या कर्जावरील व्याजदर त्यांच्या कार्यकाळात कमी करण्यात आले. त्यांच्या अनुभवाचा उपयोग संस्थेला व्हावा म्हणून त्यांची तज्ञ संचालक पदी निवड करण्यात आली. दरम्यान पतसंस्थेला दि. ३१ मार्च २०२५ अखेर २ कोटी ८६ लाख रुपयांचा निव्वळ नफा झाला असून संस्थेने ११० कोटी रुपये ठेवीचा टप्पा पार केला आहे. संस्थेचे खेळते भांडवल १८५ कोटी रुपये झाले आहे. संस्था सभासदांना ९.४०% व्याज दराने अल्पावधीत रू ५० लाख रुपयांपर्यंत कर्जपुरवठा करीत असून अद्याप पर्यंत १५८ कोटी रुपयांचे कर्जवाटप केले असल्याची माहिती संस्थेच्या अध्यक्ष वर्षा मोहिते यांनी दिली.