पंतप्रधानांनी अनावरण केलेल्या पुतळ्याची तपासणी केली नव्हती का ?

राज ठाकरेंचा सवाल
Edited by: ब्युरो
Published on: August 27, 2024 04:48 AM
views 211  views

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमध्ये 2023च्या नौदल दिनानिमित्त उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं होतं. 26 ऑगस्टला हा पुतळा कोसळला. यानंतर विरोधकांनी टीकेची झोड उठवली. आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केलीय. 


राज ठाकरेंची पोस्ट !

मालवण येथील राजकोट किल्ल्यावरचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्याची बातमी मनाला वेदना देणारी आहे. महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा, तो देखील अवघ्या ८ महिन्यांपूर्वी उभारला गेलेला, असा कोसळतोच कसा? मुळात ज्या पुतळ्याचं अनावरण पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे, त्याची तपासणी वैगरे काही केली होती का नव्हती ? आजच्या घटनेनंतर कुसुमाग्रजांच्या शहरातील 'पाच पुतळ्यांवरची' कविता आठवली. ज्यांना माहित नसेल त्यांच्यासाठी ही कविता मुद्दामून देत आहे. मध्यरात्र उलटल्यावर शहरातील पाच पुतळे एका चौथऱ्यावर बसले आणि टिपं गाळू लागले . ज्योतिबा म्हणाले ,शेवटी मी झालो फ़क्त माळ्यांचा. शिवाजीराजे म्हणाले , मी फ़क्त मराठ़्यांचा. आंबेडकर म्हणाले ,मी फ़क्त बौद्धांचा. टिळक उद़्गारले ,मी तर फ़क्त, चित्पावन ब्राम्हणांचा. गांधींनी गळ्यातला गहिवर आवरला, आणि ते म्हणाले , तरी तुम्ही भाग्यवान. एकेक जातजमात तरी तुमच्या पाठीशी आहे. माझ्या पाठीशी मात्र फ़क्त सरकारी कचेऱ्यातील भिंती ! पुतळे, स्मारकं ही फक्त आपल्यासाठी राजकीय सोय राहिली आहे. मी मागे पण अनेकदा म्हणलं होतं की, महाराजांचं खरं स्मारक, हे कुठला तरी भव्य पुतळा नसून, त्यांचे गड-किल्ले हे आहेत. पण महाराजांच्या नावाने राजकारण करायचं, मतं मागायची, सत्ता मिळवायची, आणि मग स्मारकांची टेंडर काढायची, त्यातून काही मिळतंय का, हे बघायचं इतकंच राहिलं आहे. ही प्रतिकांचं राजकारण करणारी व्यवस्था आता लोकांनी उध्वस्त केली पाहिजे. आणि तसं घडलं, तरच आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात राहतो असं म्हणू शकतो. राज ठाकरे ।