मालवणात पावसाचा जोर वाढला...!

Edited by: कृष्णा ढोलम
Published on: June 08, 2024 14:15 PM
views 165  views

मालवण : मालवणात सकाळपासून रिपरिप पडणाऱ्या पावसाने सायंकाळी काहीसा जोर पकडला. या पावसामुळे  शहरातील देऊळवाडा येथे आंब्याच्या झाडाची फांदी वीज वाहिन्यांवर पडून रस्त्यावर कोसळली होती. त्यामुळे वीज पुरवठा खंडित झाला होता. तर काही काळ वाहतूक सुद्धा बंद झाली होती. स्थानिक नागरिक आणि वीज वितरण कर्मचाऱ्यांनी सदरील झाडाची फांदी हटविली. तसेच वीज सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरु केले. दरम्यान, संपूर्ण तालुक्यात विजेचा लपंडाव सुरु असून वीज वितरणची पहिल्याच पावसात दाणादाण उडाली.

गेले अनेक दिवस प्रचंड उष्म्याने मालवण वासिय हैराण झाले होते. अखेर शुक्रवार पासून पावसाची रिपरिप सुरु झाली आहे. समुद्रही खावळला असून किनाऱ्यावर जोरदार लाटा धडकत आहेत. पाऊस कायम राहिल्यास लवकरच शेतीच्या कामाना सुरुवात होणार आहे. शेतकऱ्यांनी शेतीसाठी आवश्यक साहित्य, यंत्र सामुग्री, खरेदी करण्यास सुरुवात केली आहे. आंबा बागायतदारांनी खते खरेदी करण्यासाठी सुरुवात केली आहे. बागायतदारांची शेतकरी सोसायटीनी खते खरेदीसाठी लगबग पाहायला मिळत आहे. 

विजेचा लपंडाव सुरु 

पहिल्याच पावसात वीज वितरणची दाणादाण उडल्याची दिसत आहे. सुरुवातीला 30 तास मालवणचा वीज पुरवठा बंद होता. त्यानंतर आता पुन्हा सुरु झालेल्या पावसाने विजेचा लपंडाव हा सुरूच आहे. शुक्रवारी रात्री खंडित झालेला विद्युत पुरवठा शनिवारी सकाळी पूर्ववत झाला. त्यानंतर पुन्हा पावसाची रिपरिप सुरु झाल्यानंतर दिवसभर विजेचा लपंडाव सुरूच होता.