
दोडामार्ग : दोडामार्ग तालुक्याला अवकाळीने अक्षरशः झोडपून काढले. सोसाट्याच्या वारा व मेघगर्जनेसह सुरू झालेला पाऊस दिवसभर तुफान फटकेबाजी करत होता. शहरासह इतर भागात साधारण 5 ते 6 तास लाईट गुल झाली होती. या पावसाने तालुक्यात दाणादाण उडवून दिली.
गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाने तालुक्यात थैमान घातले आहे. दिवसाआड लागणारा पाऊस दररोज कोसळत आहे. तालुक्यात बुधवारपासून तर अवकाळीची रिपरिप सुरूच आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची मान्सून पूर्व कामे खोळंबली आहेत. ही कामे पूर्ण करण्यासाठी शेतकरी वर्ग पाऊस जाण्याची वाट पाहत आहे. मात्र यातून त्याला दिलासा मिळण्याची शक्यता बनत चालली आहे.
हवामान खात्याने सोमवार दि. १९ ते २३ मे पर्यंत अवकाळी पावसाची शक्यता वर्तविली आहे. दरम्यान २० ते २२ मे पर्यंत सिंधुदुर्ग जिल्ह्यात अतिवृष्टी होणार असल्याने जिल्हा प्रशासनाने हे तीन दिवस ऑरेंज अलर्ट घोषित केला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पाऊस मंगळवारी तालुक्यात धुवाॅंधार कोसळला. तत्पूर्वी ढग दाटून आले होते. वाराही सुटला होता. ढगांचा गडगडाट व विजांचा कडकडाट सुरू झाला अन् पाऊस कोसळू लागला. अचानक आलेल्या पावसामुळे सर्वांचीच तारांबळ उडाली.
शहरासह संपूर्ण तालुक्यात मुसळधार पाऊस बरसत होता. काही ठिकाणी झाडांची पडझड झाली. गटार, नाले भरून वाहू लागले. काही ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचले. वीजपुरवठा खंडित झाला. सायंकाळी उशिरापर्यंत पाऊस सुरू होता. काही वेळ विश्रांती घेत पुन्हा तुफान पाऊस लागत होता. यावेळी वातावरणात कमालीचा गारवा पसरला होता. त्यामुळे गर्मीने हैराण झालेल्यांना मोठा दिलासा मिळाला.