
वैभववाडी : तालुक्यात गेल्या पाच दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. पावसामुळे नदी नाले प्रवाहित झाले आहेत. नापणे व आचिर्णे येथील दोन घरांची पडझड होऊन नुकसान झाले आहे. तसेच करुळ घाटात काही ठिकाणी दरडी कोसळल्या. यामुळे वाहतूक विस्कळित झाली होती.
तालुक्यात मान्सून पुर्व पावसाने झोडपले. गेले पाच दिवस पावसाच्या जोरदार सरी सर्वत्र कोसळत आहेत. बुधवारी सकाळपासून पावसाचा जोर पुन्हा वाढला आहे. त्यामुळे तालुक्यातील बहुतांश नद्या, नाले प्रवाहित झाले आहेत. या पावसामुळे आचिर्णे व नापणे येथील दोन घरांची पडझड होऊन नुकसान झाले. तसेच करुळ घाटात तीन ठिकाणी दरडींचा काही भाग रस्त्यावर आला होता. यामुळे या मार्गावरील वाहतूक विस्कळित झाली होती. सायंकाळी सर्व ठिकाणी पडलेल्या दरडी हटवून वाहतूक सुरळीत करण्यात आली. भुईबावडा घाटातील वाहतूक सुरळीत सुरू होती. पावसामुळे ग्रामीण भागातील विद्युत पुरवठा विस्कळित झाला होता.
मान्सून पुर्व पावसाच्या सरींमुळे अंतिम टप्प्यात आलेली रस्त्यांची अनेक कामे खोळंबली आहेत. तळेरे -कोल्हापुर राष्ट्रीय महामार्गाला या पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे. तालुक्यात सुख नदीवरील पूलाचे काम अर्धवट स्थितीत आहे. या पावसाचा जोर कायम राहील्यास सुख नदीच्या पाण्याचा प्रवाह वाढून येथील पर्यायी मार्ग पाण्याखाली जाण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे शहराशी संपर्क तुटू शकतो.