Rain Alert | सिंधुदुर्गातील शाळांना गुरुवारी सुट्टी

Edited by: भरत केसरकर
Published on: July 19, 2023 22:02 PM
views 228  views

सिंधुदुर्ग : कोकणासह राज्यात मुसळधार पाऊस पडत असून नद्यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यासह कोकणातील रायगड, रत्नागिरी, ठाणे व मुंबई जिल्ह्यांतील माध्यमिक व प्राथमिक शाळांना उद्या गुरूवारी 20 जुलैला शासनाने सुट्टी जाहीर केली आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांना ही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. 20 ते 23 जुलै पर्यंत पावसाचा येलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी तत्काळ कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी रायगड या जिल्ह्यांना सुट्टीचे आदेश दिले आहेत. याची दखल घेत सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी तत्काळ सुट्टीचे परिपत्रक जारी केले आहे. याबाबत माध्यमिक शिक्षणाधिकारी मुश्ताक शेख यांना विचारले असता त्यांनी याला दुजोरा दिला असून यासंदर्भात परिपत्रकही काढल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांना गुरुवारी 20 जुलै रोजी शासनाने सुट्टी जाहीर केली आहे.

मुख्याध्यापक संघटना च्या माध्यमातून व मुख्याध्यापकांच्या माध्यमातून हा आदेश माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी पोचवला आहे . मुलांना सुट्टी असल्याचे आदेश पोहोचवण्यासंदर्भात माध्यमाद्वारे, वृतपत्रे, इलेक्ट्रॉनिक मिडीया व सोशल मिडीया या द्वारे कळविण्यात यावे असे आदेशात म्हटले आहे. त्यामुळे उद्या कोणीही विद्यार्थ्यांनी शाळेत येऊ नये व घराबाहेर पडू नये अशा पद्धतीचे आदेश माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी दिले आहेत.