
सावंतवाडी : गेल्या ९ वर्षांपासून प्रलंबित असणाऱ्या सावंतवाडी टर्मिनसचा मुद्दा सुशोभीकरणावेळी लागलेल्या 'सावंतवाडी रोड' फलकामुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यातच सावंतवाडी रेल्वे स्थानकाबाहेर लागलेले बॅनर देखील चर्चेचा विषय ठरत आहेत. प्रवेशद्वारावर लागलेला 'सावंतवाडी रोड' या नावाच्या निषेधाचा बॅनर व त्या शेजारील 'हर घर टर्मिनस मोहिम' हा बॅनर चांगलाच चर्चेत आहे. कोकण रेल्वे प्रवासी संघटनेच्या माध्यमातून एक मेल हक्काच्या सावंतवाडी टर्मिनससाठी' ही मोहीम हाती घेतली आहे. याद्वारे एकाच दिवसात केंद्र, राज्य सरकार व रेल्वे, कोकण रेल्वेला तब्बल १२०० मेल पाठवले गेलेत.
या मोहीमेअंतर्गत एकाच दिवसात तब्बल बाराशे मेल केंद्र, राज्य सरकार व रेल्वे प्रशासन, कोकण रेल्वे प्रशासनाला पाठवले गेले आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री व परिवहन खात्याकडून त्याची दखल देखील घेण्यात आली आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री, राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, खासदार नारायण राणे, आमदार दीपक केसरकर, परिवहन खात, कोकण रेल्वे, केंद्रीय रेल्वे प्रशासन आदींना हे मेल एकाचवेळी पाठले गेले आहेत. कोकणवासियांच्या हक्कासाठी 'हर घर टर्मिनस मेल' ही मोहीम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. ९ वर्ष रखडलेल सावंतवाडी टर्मिनस पूर्णत्वास यावं, कोकण रेल्वेचे शिल्पकार प्रा. मधू दंडवते यांच नाव त्याला द्याव याकरिता कोकण रेल्वे प्रवासी संघटना आग्रही आहे. सावंतवाडी स्थानकावर लांब पल्ल्याच्या गाड्यांना न मिळणारे थांबे हे यामागील प्रमुख कारण आहे.
कोकण रेल्वेचे शिल्पकार प्रा. मधू दंडवतेंनी कोकणवासीयांसाठी कोकण रेल्वे सुरू केली. मात्र, त्याचा लाभ कोकणवासीयांना होण्याऐवजी दक्षिणेकडील प्रवाशांना अधिक होत आहे. कोकणातील चाकरमान्यांसाठी कोकण रेल्वेच्या मांडवी, कोकणकन्या किंवा दादर-सावंतवाडी (तुतारी एक्स्प्रेस) या तीनच गाड्या उपलब्ध आहेत. यामुळे चाकरमान्यांना गर्दीत गुदमरून कोकणचा प्रवास करावा लागत आहे. ज्या महाराष्ट्र राज्याने कोकण रेल्वेसाठी सर्वाधिक २२ टक्के गुंतवणूक केली त्यांच्या वाट्याला फक्त तीनच रेल्वे आल्याचे प्रवासी संघटनेकडून सांगण्यात येत आहे. गणेश चतुर्थीनिमित्ताने मोठ्या प्रमाणात चाकरमानी सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत आहेत. यातील बहुतांश चाकरमानी हे रेल्वेने येतात. अनेक चाकरमान्यांना रेल्वेचे तिकीट बुकिंग करूनही अवघ्या काही सेकंदात आरक्षण फुल दाखवण्यात येते. त्यामुळे अनेक चाकरमान्यांना कोकणात येणाऱ्या रेल्वेत उभे राहून प्रवास करणे भाग पडते. अशातच सावंतवाडी टर्मिनस हा मूळ मुद्दा शासन जाणूनबुजून दुर्लक्षित करत असल्याचा आरोप संघटनांकडून केला जात आहे.
२७ जून २०१५ रोजी सावंतवाडी रेल्वे टर्मिनसचे थाटामाटात भूमिपूजन झाले. एका फेजच कामही झाले. मात्र, त्यानंतर टर्मिनस दुर्लक्षितच राहिले. कोकणात टर्मिनस नसल्याने वाढीव एक्स्प्रेसची मागणी करूनही गाड्या मिळत नाहीत. कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण करावे किंवा स्वतंत्र विभाग बनवावा, प्रत्येक स्टेशनचा आरक्षण कोटा वाढवून त्याला जास्तीचे हॉल्टस मिळावेत आदी मागण्या मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. मात्र, कित्येक एकर हक्काच्या जमिनी देऊनही कोकणात टर्मिनस नसल्याची खंत कोकणवासीयांकडून व्यक्त करण्यात येत आहे. यात कोकण रेल्वे प्रवासी संघटनेकडून 'हर घर टर्मिनस मेल' ही प्रभावी मोहीम हाती घेण्यात आल्याने शासन यावर गांभीर्याने लक्ष देईल अशी अपेक्षा आहे.