महिला पर्यटक - महिला महिला कर्मचारी यांच्यात 'राडा' | किल्ले सिंधुदुर्ग इथला धक्कादायक प्रकार

साताऱ्यातील महिलांनी माफी मागीतल्यानंतर वादावर पडदा !
Edited by: प्रतिनिधी
Published on: January 21, 2023 11:17 AM
views 539  views

मालवण : किल्ले सिंधुदुर्ग येथे आलेल्या सातारा येथील काही महिला पर्यटकांनी कर वसुली करणाऱ्या ग्रामपंचायतीच्या महिला कामगारांना मारहाण केल्याची घटना शुक्रवारी घडली. या घटनेनंतर संतापलेल्या स्थानिक महिलांनीही त्या पर्यटकांची धुलाई केली. अखेर दोन्ही गटात झालेल्या चर्चेअंती सातारा येथील त्या महिलांनी महिला कामगारांची माफी मागितल्यानंतर या प्रकरणावर पडदा पडला. 


किल्ले सिंधुदुर्ग येथे पर्यटनासाठी  सातारा येथील महिला व पुरुष असा समूह गेला होता. किल्ल्यावर वायरी भुतनाथ ग्रामपंचायतीच्या वतीने पर्यटकांकडून कर आकारणी केली जाते. सातारा येथील या पर्यटकांकडे कराची मागणी केली असता त्यांनी तो देण्यास नकार दिला. किल्ला पाहून झाल्यानंतर या महिला पर्यटक पुन्हा कर वसुलीच्या ठिकाणी आल्या आणि त्यांनी वसुली करणाऱ्या महिला कामगारांशी हुज्जत घालत मारहाण केली. या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली. या प्रकाराची माहिती महिला कामगारांनी सरपंच, ग्रामसेवक यांना दिली. त्यानंतर सातारा येथील पर्यटकांना बंदर जेटी येथे बोलावून घेत विचारणा केली असता त्यांनी पुन्हा हुज्जत घालण्यास सुरवात केली. महिला कामगारांना मारहाण केल्याने संतप्त बनलेल्या स्थानिक महिलांनीही सातारा येथील महिला पर्यटकांची धुलाई केली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. हे प्रकरण पोलीस ठाण्यात पोहोचले. ग्रामपंचायतीच्या महिला कामगारांना मारहाण झाल्याची माहिती मिळताच येथील पोलीस ठाण्यात सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी, ग्रामपंचायत सदस्य, महिलांनी धाव घेत पोलीस निरीक्षक विजय यादव यांच्याशी चर्चा केली. 


पर्यटकांकडून ग्रामपंचायत कामगारांना झालेल्या मारहाण प्रकरणी तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. पोलिसांनी संबंधित पर्यटकांना बोलावून घेत चौकशी केली. त्यानंतर स्थानिक पदाधिकाऱ्यांनी संबंधित पर्यटकांनी कामगारांची माफी मागावी अशी मागणी केली. दोन्ही गटात झालेल्या चर्चेअंती रॉकगार्डन परिसरात सातारा येथील त्या महिला पर्यटकांनी महिला कामगारांची माफी मागितल्यानंतर या प्रकरणावर पडदा पडला.