
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शुक्रवारी विधानसभेत पुरवणी मागणीवरील चर्चेदरम्यान रत्नागिरी सार्वजनिक बांधकाम विभागातील डांबर घोटाळा उघडकीस आणला. सरकारमधील मंत्र्याच्या वरदहस्ताने डांबरच्या बिलातून शेकडो कोटी रुपये उकळले असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. आर. डी. सामंत कन्स्ट्रक्शन नावाची एक कंपनी आहे. ही कंपनी रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक शासकीय कामांचे कंत्राट घेते. आपल्या सरकारमधील एका मंत्र्यांचे सगेसोयरे या कंपनीमध्ये कार्यरत आहेत . या मंत्र्यांचा वरदहस्तामुळे या कंपनीने सार्वजनिक बांधकाम विभाग, एमआयडीसी, नॅशनल हायवे इत्यादी विभागांमधील कामे घेऊन प्रचंड मोठा घोटाळा केला आहे. या कंपनीने केलेल्या दोन–तीन कामांचे उदाहरण यावेळी जयंत पाटील यांनी दिली.
आर. डी. सामंत कन्स्ट्रक्शन कंपनीने सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत रत्नागिरी येथील रेवस रेड्डी रोडचे रुंदीकरण आणि डांबरीकरणाचे काम केले. या कामासाठी वापरलेल्या डांबराच्या बिलाचा नंबर आणि रत्नागिरी एमआयडीसी पाणीपुरवठा योजनेंतर्गत ॲप्रोच रोड ते जॅकवेलपर्यंत जाणाऱ्या डांबरी रस्त्याचे नुतनीकरण करण्याच्या कामासाठी वापरलेल्या डांबाराच्या बिलाचा नंबर एकच आहे. (बिलाचा नंबर – BPCL 4582111044) म्हणजेच या दोन्ही कामांसाठी एकच डांबर बील वापरून पैसे काढण्याचे काम झाले आहे.
आर. डी. सामंत कन्स्ट्रक्शन कंपनीने नेवरे - भांडारपूळे रोड या सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत केलेल्या रस्ता रुंदीकरण आणि ब्लॅक टॉपींग कामासाठी वापरलेल्या डांबराचे पावती क्रमांक BPCL 4582165210 हा आणि MIDC अंतर्गत रत्नागिरी पाणी पुरवठा योजना अंतर्गत हरचिरी जॅकवेल पर्यंत जाणारा ॲप्रोच रस्ता पुर्नडांबरीकरणाचे केलेले कामाचे डांबराच्या बिलाचा नंबर देखील सारखाच आहे. म्हणजेच या दोन्ही कामासाठी देखील एकच डांबर बील वापरून पैसे काढण्याचे काम झाले आहे.
आर. डी. सामंत कन्स्ट्रक्शन कंपनीने एप्रिल २०२३ मध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग उत्तर रत्नागिरी अंतर्गत उपविभाग क्रमांक १ यांनी निवळी जयगड या रस्ता कामासाठी वापरुन संपवलेली डांबराची बिले ऑगस्ट २०२३:मध्ये पुनश्च 1) Rehabilitation & Upgradation of NH-66 (Old NH-17) कांटे ते वालकेड
2)Rehabilitation & Upgradation of NH-66 (Old NH-17) अरावली ते कांटे
या दोन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कामांसाठी दाखवून ८ कोटी ५२ लाख ५३ हजार ६४१ रुपये उकळले आहेत. यात महत्वाची बाब म्हणजे टेंडर मधील अटी व शर्तीनुसार ज्यावेळी अभियंता डांबराचा वापर दाखवतो त्यावेळी ठेकेदाराने दिलेल्या ओरीजनल बिलावर क्रॉस करुन कार्यालयाचा सही शिक्का मारुन त्याची झेरॉक्स ठेकेदाराला इतर लेखा ठेवण्यासाठी परत द्यावयाची असते. ज्यावेळी डांबराची बिले माहे एप्रिल २०२३ मध्ये उपअभियंता सा.बां. उप विभाग क्र.१ यांनी वापरली त्यावेळी बिल क्रॉस न करता ओरिजनल डांबराची बिले ठेकेदाराला परत केल्याने तीच बिले ठेकेदाराने दुसऱ्या कामासाठी म्हणजेच राष्ट्रीय महामार्गावर वापरुन, न केलेल्या कामाच्या बिलाची रक्कम घेतलेल्या आहेत. या सर्व कामामध्ये संगमताने साडे आठ कोटी पेक्षा जास्त रक्कमेचा अपहार झालेला आहे असे जयंत पाटील यांनी सभागृहात सांगितले.
ही उदाहरणे देत असताना जयंत पाटील यांनी या कंपनीने अशा प्रकारचे शेकडो कोटीचे अनेक भ्रष्टाचार केले आहे असा आरोप देखील केला. तसेच या प्रकरणात अनेक अधिकारीही सामील असून तेही या भ्रष्टाचारास तितकेच जबाबदार आहेत असे ते म्हणाले. सरकारमधील लोकांनी रस्त्यावर वापरल्या जाणाऱ्या डांबरामध्ये भ्रष्टाचार करुन सरकारचे तोंड काळे केले आहे. संबंधित अधिकाऱ्यांवर व ठेकेदारांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत. या कंपनीने केलेल्या सर्व कामांची चौकशी करण्यात यावी. तसेच, आपण या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन कंपनीवर व दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी करण्याचे निर्देश द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.