सिंघम अधिकारी अजयकुमार सर्वगोड यांनी झापलं शाखा अभियंत्याला ; पहा नेमकं काय घडलं ?

कळणेत ग्रामस्थ उतरले रस्त्यावर
Edited by: संदीप देसाई
Published on: June 26, 2023 17:56 PM
views 208  views

दोडामार्ग :  बांदा ते आयी राज्यमार्गालगतची खचलेली बाजूपट्टी येत्या दोन दिवसांत दुरुस्त करा. अन्यथा संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल करू असा कडक इशारा सार्वजनिक बांधकाम विभागाचे सावंतवाडीचे प्रभारी कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगौड यांनी शाखा अभियंता विजय चव्हाण यांनाच दिला आहे.  पावसाळ्यापूर्वी रस्ते दुरुस्ती कामे का करून घेतला नाही? पावसाळा येईपर्यंत ठेकेदार आणि आपण झोपला होता का? त्यामुळे दोन दिवसानंतर याबाबत कोणतीही तक्रार ऐकून न घेता सरसकट गुन्हा दाखल केल्याशिवाय गप्प बसणार नाही अशा शब्दात अजयकुमार सर्वगौड यांनी विजय चव्हाण यांची कानउघाडणी करत त्यांना ठणकावले आहे.

बांदा-दोडामार्ग राज्यमार्गाच्या साईड पट्टीवर एमएनजीएल कंपनीच्या ठेकेदारांनी खोदाई करून गॅस पाईपलाईनचे काम केले. काम पूर्ण झाल्यानंतर दगड व खडीच्या साहायाने साईडपट्टी मजबूत करणे  आवश्यक होते. मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात आला. पावसाच्या सुरवातीलाच त्याचे गंभीर परिणाम वाहनचालक, प्रवासी व ग्रामस्थांना भोगावे लागत आहेत. या राज्यमार्गाची बाजूपट्टी ठिकठिकाणी खचल्याने अनेक अपघात होत आहेत. त्यामुळे ग्रामस्थांचा या अधिकाऱ्यांविरोधात रोष वाढत चालला आहे. आज याबाबत कळणे ग्रामस्थ रस्त्यावर उतरले आणि बांधकाम अधिकाऱ्यांना धारेवर धरत जाब विचारला.

   कळणे येथे बाजूपट्टी खचल्यामुळे रविवारी एसटीला अपघात घडला. मात्र स्थानिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत एसटी बस चरातून बाहेर काढली व मोठा अनर्थ टळला. त्यामुळे तेथील ग्रामस्थांच्या रागाचा पारा चढला. आणि आज या रस्त्याची देखभाल दुरुस्ती जबाबदारी असलेले अभियंता विजय चव्हाण यांना कळणे येथे बोलाऊन घेत त्यांना घेराव घातला. यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी रस्त्यावरच आंदोलन छेडले. शाखा अभियंता विजय चव्हाण यांना मोबाईलद्वारे संपर्क साधून आंदोलनस्थळी बोलावून घेतले. ते दाखल होताच ग्रामस्थांनी त्यांना घेराव घातला व खचलेल्या बाजूपट्टीबद्दल जाब विचारला. यावेळी टेंडरच्या नावाखाली वेळ मारून नेण्याचा चव्हाण यांनी केविलवाणा प्रयत्न केला. मात्र एकनाथ नाडकर्णी यांनी प्रभारी कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगौड यांना संपर्क साधला. व शुक्रवार पर्यंत काम पूर्ण करा, अन्यथा आंदोलनास सामोरे जा असा इशारा बांधकाम ला दिला आहे. यावेळी शिवसेनेचे जिल्हा उपाध्यक्ष तुकाराम बर्डे, कळणे सरपंच अजित देसाई यांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


आमचे जीवच घ्या : पुरुषोत्तम देसाई

       बाजूपट्टी खचल्यामुळे दिवसागणिक अपघातांची संख्या वाढत आहे. याबाबत वारंवार आवाज उठवूनही आपण अधिकारी जाणून बुजून दुर्लक्ष करत आहात. आमच्या दारात आपण ही भयावह परिस्थिती निर्माण केला आहात. तुम्ही वारंवार कारणे देत संबंधित ठेकेदाराला  पाठीशी घालून लोकांचा जीव टांगणीला लावला आहे. ज्यांच्यासाठी तुम्ही काम करता त्या लोकांच्या जिवाशी तुम्हाला काहीही देणेघेणे नाही. त्यामुळे एक तर रस्ते दुरुस्त करा, नाहीतर आमचे जीव घ्या, अशी उद्विग्न भावना यावेळी ग्रामस्थांनी विजय चव्हाण यांच्यासमोर मांडली. 

  

शुक्रवारी सर्वपक्षीयांचा रास्तारोको

       एकनाथ नाडकर्णी यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधीक्षक अभियंता छाया नाईक यांना संपर्क साधून त्यांचेही याकडे लक्ष वेधले. तसेच येत्या दोन दिवसात बांदा-आयी राज्यमार्गाच्या बाजूपट्टीवर संपूर्ण खडीकरण करण्यात यावे. शिवाय कळणे येथील संपूर्ण धोकादायक साईड पट्टी दुरुस्त करण्यात यावी. अन्यथा शुक्रवारी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी रास्ता रोको आंदोलन छेडतील, असा सक्त इशारा बांधकाम विभागाला दिला आहे.