
सावंतवाडी : कोकण रेल्वेच्या सावंतवाडी टर्मिनस प्रकरणी एक लोकप्रतिनिधी म्हणून मी जागरूक असून या प्रश्नाची आपणास जाणीव आहे. त्यामुळे सातत्याने या प्रश्नी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करत आहे. आता राज्य सरकारवर दबाव टाकून हा प्रश्न सोडवण्याची गरज आहे. जोपर्यंत राज्य शासन केंद्र सरकारकडे कोकण रेल्वे भारतीय रेल्वेमध्ये विलीन करून घेण्याचा प्रस्ताव मंजूर करत नाही तोपर्यंत हा प्रश्न सुटणार नाही. राज्याकडून प्रस्ताव गेल्यास केंद्रात तो मंजूर करण्यासाठी केंद्र सरकारवर दबाव आम्ही टाकू अस आश्वासन उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे सिंधुदुर्ग रत्नागिरीचे खासदार विनायक राऊत यांनी कोकण रेल्वे प्रवासी संघटनेच्या शिष्टमंडळाला दिले.
ते म्हणाले, जसे बॅरिस्टर नाथ पै यांच्या नावाची सिंधुदुर्ग विमानतळासाठी मागणी केली तशीच प्रा. मधू दंडवते सावंतवाडी रेल्वे टर्मिनसची मागणी आपण केंद्राकडे केली आहे. महाराष्ट्र राज्य सरकारच्या कॅबिनेटमध्ये हा प्रस्ताव मंजूर करून तो केंद्र सरकारकडे पाठवायला हवा यासाठी राज्य सरकारवर दबाव टाका, आपण तुमच्या सोबत आहोत असं खासदार विनायक राऊत यांनी कोकण रेल्वे प्रवासी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना आश्वासन दिले. खा. राऊत यांची कोकण रेल्वे प्रवासी संघटनेच्या शिष्टमंडळाने अध्यक्ष अॅड संदीप निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली भेट घेतली. यावेळी सागर तळवडेकर, सुभाष शिरसाट, नंदू तारी, तेजस पोयेकर आदींनी त्यांना निवेदन सादर केले.यावेळी 26 जानेवारी होणाऱ्या आंदोलनात आमचे शिवसैनिक सहभागी होतील असेही आश्वासन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना दिले. यावेळी जिल्हाप्रमुख संजय पडते सावंतवाडी तालुकाप्रमुख रुपेश राऊळ उपस्थित होते.
राज्य शासनाकडून मंत्रिमंडळात मंजूर करून सावंतवाडी टर्मिनस चा प्रस्ताव केंद्रात पाठवा तो मंजूर करण्यासाठी आम्ही सक्षम आहोत असे आश्वासन खासदार राऊत यांनी या शिष्टमंडळाला दिले. यासाठी येथील केंद्रीय मंत्री आणि राज्यातील पालकमंत्री व मंत्री यांच्यावर दबाव टाका आणि हे प्रस्ताव तातडीने पाठवा असे ते म्हणाले. तर राज्य शासनालाही आम्ही निवेदन दिलेले आहे. सध्याचे राज्य सरकारतील मुख्यमंत्री व अज्ञान मंत्र्यांना आम्ही भेटणार नाही. मात्र, संसदेत हा प्रस्ताव आल्यास त्याला मंजुरी मिळण्याकरिता सर्व खासदार एकत्र येऊन हा प्रस्ताव मंजूर करून घेऊ असे ते म्हणाले.
या प्रश्नासाठी आपण केंद्रातील मंत्री आणि राज्यातील मंत्री यांच्याकडे हा प्रश्न दिला त्यांनी तो मांडला काय ? असा सवाल खासदार राऊत यांनी करून केंद्रीय मंत्री नारायण राणे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर आणि पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला केला. मात्र, हा प्रश्न आपण सातत्याने संसदेत उपस्थित केला असल्याचे ते म्हणाले. कोकण रेल्वेचा प्रश्न सोडवायचा असेल तर कोकण रेल्वे ही भारतीय रेल्वेमध्ये विलिन होण्याची गरज आहे. कोकण रेल्वे जेव्हा भारतीय रेल्वेत विलीनीकरण होईल त्यावेळी कोकण रेल्वे हा स्वतंत्र झोन ठेवून भारतीय रेल्वेत असावा अशा पद्धतीची मागणी आपण केली असल्याचे ते म्हणाले.